१४ वर्षांनी हुंडा परत केला, कारण……

images     खरोखर जालिंदर कागणेंचे कौतुक करावेसे वाटते! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ‘कोण हे जालिंदर कागणे?’ स्वाभाविकच आहे म्हणा! पण सांगतो, जालिंदर आहेत नांदेड जिल्ह्यातील मालाकोळी गावाचे रहिवासी. चौदा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्नावेळी त्यांनी रुढीप्रमाणे हुंडाही घेतला, एक लाख रुपये! सगळे कसे सुरळीत चालले होते. मुळात कागणेंचा स्वभाव सामाजिक विचार करणारा. नेहमी येणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्येच्या बातम्या वाचून-ऐकून त्यांचे मन व्यथित होई. याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला असता कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या अनिष्ट हुंडापद्धतीत त्यांना याचे मूळ सापडले. तेव्हा लग्नावेळी आपण स्वतः एक लाख रुपये हुंडा घेतल्याची आठवण त्यांना झाली आणि कुठेतरी मनात अपराधी भावना वाटायला लागली. त्यांना हुंडा घेतलेली रक्कम सासरच्या लोकांना परत करण्याची तीव्र इच्छा झाली. स्त्रीभ्रूण हत्या आणि हुंडापद्धतीविरोधात जनजागृती करावेसे त्यांना वाटू लागले. ह्यासंदर्भात आईवडिलांची चर्चा केली असता त्यांना आपल्या मुलाच्या समाजशील विचारांचे कौतुक वाटले आणि हुंड्याची रक्कम परत करण्यास तत्काळ परवानगी देवून टाकली. ‘आपला नवरा अचानक हुंड्याची रक्कम का परत करतोय? तो आपल्याला घटस्फोट तर देत नाहीये ना?’ असे त्यांच्या पत्नीला वाटणे स्वभाविकच होते, मात्र त्यामागचे कारण समजल्यानंतर तिला पतीचा अभिमान वाटायला लागला! सासरच्या मंडळींनीही जावयाच्या भूमिकेचे स्वागत करतांना ही रक्कम स्वतःजवळ ठेऊन न घेता हजारो निराधारांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला दान देण्याचा निर्णय घेतला!

     ही घटना केवळ एक नाही, ‘स्त्रीजन्म नाकारणे, हुंडा पद्धती आणि निराधारांच्या पालन पोषणासाठी मदत’ अशा तीन गोष्टींवर विचार करायला लावणारी आहे. प्रत्येकाला आजी, आई, बहिण, मैत्रीण, पत्नी, प्रेयसी, आत्या, मामी हव्यात मात्र मुलगी नकोशी वाटते. प्रत्येकजण मुलगी नाकारायला लागला तर इतकी नाती कुठून निर्माण होणार? नवीन जीव कसा जन्माला येणार?

हुंडापद्धतीने तर अनेक विवाहित स्त्रियांचे जीवन धुळीस मिळविले. कित्येक विवाहिता माहेरी परत आल्या तर कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला. हुंड्यासाठी झालेल्या छळाने अनेक विवाहितांच्या जीवनाचे मातेरे करून टाकले. ही प्रथा बंद व्हावी अशी ‘ओरड’ नेहमीच ऐकायला मिळते, मात्र हुंड्यात दिल्या-घेतलेल्या रकमेवरच आज प्रतिष्ठा तोलली जाते ही वस्तुस्थिती आहे.

ज्यांना कुणी नाही अशांचे संगोपन करणाऱ्या संस्था आज कार्यरत आहे. मात्र निधीची चणचण त्यांना भासत असते. त्यासाठी सरकारी पातळीवरून अनुदान मिळते, मात्र ते पुरेलच असे नाही. त्यासाठी समाजातील सधन नागरिकांनी अथवा प्रेत्येकाने वेगवेगळ्या कारणाने, कुणाच्या तरी स्मरणार्थ अशा संस्थांना मदत केली तर नक्कीच एक चांगले काम केल्याचे समाधान त्यांना लाभेल आणि अशा संस्थांची अवस्थाही सुधारेल.

ह्या एका घटनेने तीन चांगले बोध घेण्यासारखे आहेत. मुलगा-मुलगी काहीही असो त्यांना समान वागणूक देणे. हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही असा ठाम निश्चय आमलात आणणे आणि गरजूंना यथाशक्ती मदत करणे!

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *