किल्ले सिंहगड

Kalyan_Darawaja_on_Sinhgad_Fortसिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.

*मार्ग : -स्वारगेट – आनंदनगर – वडगांव – खडकवासला – सिंहगड पायथा. स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

Sinhagad-Fort-maharastra*गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार.

टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत.

कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर’ : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. दरवर्षी माघ नवमीस येथे  तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो.

कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.

उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.

राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *