अंतराळ सफर….”सव्वा लाखा”ची…..!
|‘तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणीन’ असे चित्रपट-मालिकेतील प्रियकराने आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हटलेले आपण नेहमीच ऐकतो, आता चंद्र-तारे तोडून आणणे तर नाही, मात्र अंतराळाची सफर घडविणे मात्र शक्य होणार आहे प्रियकराला! म्हणजे तसा प्रयत्न चालू आहे.
इस्त्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी नागपूर येथे दिलेल्या व्याख्यानात वैज्ञानिकांच्या विशेष प्रयत्नातून येत्या दहा वर्षांत केवळ सव्वा लाख रुपयांत (२ हजार डॉलर्स) स्पेस टुरिझम शक्य होईल अशी आशा व्यक्त केली. डॉ. आंबेडकर कॉलेजच्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यानात ते बोलत होते. गेल्या ५० वर्षांत त्यांनी इस्रोने केलेल्या कार्याची माहिती दिली. आज शेती, मृदासंशोधन, हवामान अंदाज, औषधी, शिक्षण असा विविध क्षेत्रात उपग्रह शास्त्राने क्रांती घडवून आणलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या संशोधानाचा वेग बघता इतर ग्रहांवरील जीवसृष्टीची मानवाला लवकरच माहिती मिळेल. येत्या दहा वर्षांमध्ये या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडलेले असतील असा आशावाद डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केला.