‘अबकी बार मोदी सरकार’

namo
नमो…. नमो
१६ व्या लोकसभा निवडणुकीने एक नवा इतिहास घडविला……

‘अबकी बार मोदी सरकार’, असे विरोधकांना ठणकावून सांगणारे आणि ‘अच्छे दिन आनेवाले है’, अशा शब्दांत मतदारांना आश्वस्त करणारे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इतिहास घडवला! भाजप आणि एनडीएच्या ‘मिशन २७२’ मोहिमेचे नेतृत्व करत वर्षभर देश पिंजून काढणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाजपला (२८३) केंद्रात एकहाती निर्विवाद बहुमत मिळवून दिले असून, ३३६ जागांच्या जोरावर एनडीएला दिल्लीच्या तख्तावर विराजमान केले आहे.

बडोद्यात तब्बल ५ लाख ७० हजार तर, वाराणसीत साडेतीन लाखांहून जास्त मताधिक्क्यांनी निवडून आलेल्या ‘सुपर नमों’च्या झंझावातात काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला. या ऐतिहासिक राष्ट्रीय पक्षाला अर्धशतकही गाठता आले नाही. १९८४ मध्ये केवळ दोन खासदार असलेल्या भाजपचे हे यश अभूतपूर्वच असून, ३० वर्षांनंतर या पक्षाने ५४३ जागा असलेल्या लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळवले आहे. सन १९८९ नंतर असा चमत्कार करणारा भाजप एकमेव पक्ष ठरला आहे हेही विशेष. त्या काळात ४१५ अशी विक्रमी संख्याबळ असणारी काँग्रेस आता केवळ दोन आकडी जागांपुरती उरली आहे.
भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातील जाहीर सभेत जनते आभार मानले. देशाच्या विकासामध्ये विरोधकांनीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत, प्रत्येकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी आश्वस्त केले. ‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देत त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचाही विचार मांडला.
नवं सरकार,नवे मंत्रिमंडळ ह्यांकडून आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील कि नाही हे येणाऱ्या काळात जनता अनुभवणार आहे. 
2 Comments