अल्पवयीन आरोपीलाही फाशीच योग्य शिक्षा….
|दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ‘हे चांगलेच झाले’ असे वाटले असले तरीही पाचव्या अल्पवयीन आरोपीला केवळ तीन वर्षे कारावासाची शिक्षा ऐकून संतापही झाला. ज्याला इतके अमानुष कृत्य करण्याएवढे ‘ज्ञान’ असते तो ‘अज्ञान’ कसा ठरू शकतो? केवळ वय कमी आहे म्हणून?
‘त्या’ने एखादे पाकीट मारले नाही, छोटी-मोठी चोरी अथवा मारामारी केली नाही, तर त्याच्या पाच साथीदारांसमवेत एका निष्पाप मुलीच्या अब्रूवर घाला टाकून तिची हत्या केली आहे. ह्या गुन्ह्यात तोही तितकाच दोषी आहे जितके इतर! म्हणून त्यालाही तीच शिक्षा व्हायला पाहिजे होती जी इतरांना झाली. तरच त्या पिडीत मुलीला न्याय मिळाला असे होईल. नाहीतर, ‘तीन वर्षात परत येऊ’ असे समजून काही नवीन बालगुन्हेगार जन्माला येण्याची शक्यताही नाकारता येऊ शकत नाही. काही नव्याने घडलेल्या घटनांमध्ये असे गुन्हेगार आहेतच.
बलात्कार आणि हत्येसारख्या अक्षम्य गुन्ह्यांमध्ये जर बालगुन्हेगार अडकले असतील, तर त्यांना बालगुन्हेगार समजून शिक्षा देण्यापेक्षा इतरांना देतात तशी कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. तरच बालगुन्हेगार असल्या अपराधांकडे वळणार नाहीत. अन्यथा ‘फार-फार २-३ वर्षात परत येऊ’ म्हणून येरे माझ्या मागल्या चालूच राहणार….!