आज जागतिक टपाल दिवस….

     indexप्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. कधी हे पत्र पक्ष्यांमार्फत पाठविले जाई, तर काही वेळा हे काम दुतांमार्फत केले जाई. अगदी प्रियकर-प्रेयसींनी एकमेकांशी संपर्क साधण्यापासून तर एका राज्याच्या राजाने दुसऱ्या राज्यातील राजाशी संपर्क साधण्यापर्यंत हाच पर्याय उपलब्ध होता. नंतर-नंतर व्यापक संपर्कांची आवश्यकता भासू लागल्यावर ह्या सुविधा तोकड्या पडू लागल्या.

     आधुनिक काळात दळणवळणाच्या व्यापक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून १८७४ साली आजच्याच दिवशी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची (UPU) स्थापना करण्यात आली. हि घटना दळण-वळणाची जागतिक क्रांती मानली जाते. ह्या माध्यमातून लोकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पत्राद्वारे संपर्क साधण्याचा अधिकार प्राप्त झाला. १९६९ साली टोकियो (जपान) येथे भरलेल्या UPU काँग्रेस मध्ये ९ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस टपाल खात्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

     टपाल वेळेवर न पोहोचल्यामुळे आपण बरेचदा टपालखात्यावर नाराजी व्यक्त करतो. बरेचदा पोस्टमन अथवा पोस्टाच्या शाखेत तर काहीवेळा ग्राहक मंचातदेखील टपालखात्याबद्दल तक्रारी केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, तरीही महत्वाचे टपाल पाठविण्याकरिता टपाल सेवेचाच वापर केला जातो हेही नाकारून चालणार नाही.