आज ३ मे

raja harishchandraआज ३ मे. आजच्याच दिवशी १९१३ साली दादासाहेब फाळके निर्मित, पूर्णपणे भारतीयांच्या सहभागाने बनलेला

मुंबईतील कॉरोनेशन थिंएटरमध्ये “राजा हरिश्चंद्र” हा पहिलाच भारतीय चलचित्रपट प्रदर्शित झाला. ह्या

ऐतिहासिक घटनेला आज शंभर वर्ष पूर्ण होतायेत. तत्पश्चात दादासाहेबांनी लंका-दहन, कृष्णजन्म,

कालियामर्दन अशा एकाहून एक सरस मुकपटांची निर्मिती केली, ज्यात ते कमालीचे यशस्वी ठरले.

याचवेळी कोल्हापुरात आनंदराव व बाबुराव पेंटर यांनी “सावकारी पाश” हा चित्रपट बनविला. त्यां च्याच

शिष्य व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, फत्तेलाल यांनी पुण्यात “प्रभात फिल्म कंपनी” मुहूर्तमेढ रोवली.

मात्र, पहिला बोलपट प्रदर्शित करण्याचा मान आर्देशीर इराणी यांचाच. त्यांनी “आलम आरा” ह्या पहिल्या

बोलपटाची निर्मिती केली. ह्या चित्रपटातील डब्ल्यु. एम. खान यांनी गायलेले गीत “दे दे खुदा के नाम पर” हे भारतीय

सिनेसृष्टीतील पहिलेच गीत ठरले. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तसतसे कृष्णधवल चित्रपटांच्या बरोबरीने

रंगीत चित्रपटही निर्मिले जावू लागले. परदेशी तंत्रज्ञानाच्या साह्याने निर्माण केलेला १९३२ साली प्रदर्शित

झालेला “बिल्वमंगल” हा भारतीय सिनेसृष्टीतील पहिला रंगीत चित्रपट ठरला. काही वर्षे चित्रपटातील कलाकार

स्वतःच गाणी गात असत. मात्र, १९३५ साली प्रदर्शित झालेल्या “धूप छाव” ह्या चित्रपटाद्वारे पार्श्वगायनाची

प्रथा रूढ झाली. भालजी पेंढारकरांनी “प्रभात”तर्फे निर्मिती केलेला “संत तुकाराम” हा चित्रपट इतकं गाजला

की व्हीनस चित्रपट महोत्सवात त्याची दखल घेतली गेली. अस्पी इराणी यांनी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या

साह्याने “किसान कन्या” ह्या रंगीत चित्रपटाची निर्मिती केली. ह्यानंतर मास्टर विनायकांनी निर्मिलेल्या

“ब्रम्हचारी” ह्या चित्रपटास भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या विनोदी चित्रपटाचा मान जातो. “मदर इंडिया” ह्या

चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकित झालेल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा बहुमान जातो.