आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री
| आनंदीबेन पटेल ह्या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील़, १५ व्या मुख्यमंत्री म्हणून उद्या गुरुवारी दुपारी त्या शपथ घेतील़ तब्बल १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर देशाचे नेतृत्व करायला सज्ज झालेले नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी आज बुधवारी गुजरात विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले़ यानंतर गांधीनंतर टाऊन हॉलमध्ये गुजरात विधिमंडळ दलाची बैठक झाली़ या बैठकीत ७३ वर्षीय आनंदीबेन पटेल यांना सर्वसहमतीने विधिमंडळ पक्षाचा नेता निवडले गेले़ नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय निरीक्षक थावरचंद गहलोत यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर होते़ नावाची घोषणा झाल्यानंतर व मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी लिखित भाषण वाचून दाखवले़ त्या म्हणाल्या, शेतात राबताना मला शेतकर्यांच्या समस्या समजल्या आणि शिक्षिका बनल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील समस्या मी जाणल्या़ भाजपात प्रवेश केला तेव्हा काय काम करावे, हेच मला कळत नव्हते़ पण नरेंद्र मोदी यांनी मला जनतेच्या भल्यासाठी झटण्याचे व्रत देत संघटना बांधणीचे धडे दिले़ कुठल्याही महिलेसाठी राजकीय पक्षात काम करणे तुलनेने कठीण असते़ पण भाजपात महिलांना सर्व सुविधा पुरविल्या जातात़ त्यांना चांगले काम करण्याच्या अपार संधी दिल्या जातात़ पक्षाने आज मला गुजरातच्या पहिल्या मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान दिला आहे़ ही जबाबदारी तेवढेच कष्ट आणि निष्ठेने मी पार पाडेऩ
har har modi