आभाळ फाटलं….निसर्ग कोपला
|
आभाळ फाटलं….निसर्ग कोपला
माळीण हे गाव मंचरपासून 50 व पुण्यापासून 125 किलोमीटर अंतरावर आहे. या गावच्या सात वाड्या व गावठाण मिळून 900 लोकवस्ती आहे. गेले दोन दिवस या भागाला पावसाने झोडपून काढले. तब्बल 200 मिलिमीटर पाऊस झाल्याने नागरिकांना घराबाहेर निघणे अवघड झाले होते. गावठाणाची लोकसंख्या 170 आहे. या गावठाणाला लागूनच माडमाचा डोंगरकडा आहे. पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा कडा कोसळला. काही कळण्याच्या आतच मुरुम, मोठे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली तेथील 48 घरे गाडली गेली. कोणालाही घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. पावसामुळे शेतकरी भात लावणीच्या तयारीत होते. त्यासाठी शेजारच्या गावांतील 50 जण गावात मुक्कामाला आले होते. तेही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. डोंगरावरील दगड व माती वाहून आल्यामुळे संपूर्ण गावात चिखलाचे ढीग साचले. या ढिगातून नागरिकांचा शोध घेणे ही जिकिरीची बाब ठरली. त्यात सकाळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे आले.
मारे 500 मीटरचा डोंगरकडा कोसळून दोनशे जण गाडले गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये सुमारे 50 मुले आहेत. सततच्या पावसामुळे आणि चिखलामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले.