आहार घेताना

healthy foodआहार घेताना तो वेळेवर हवा. म्हणजे प्रत्येकाने चार वेळा आहार घ्यावा. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण, सायंकाळी थोडा फराळ आणि रात्री जेवण. या चारही वेळेस थोडे थोडे खावे. सकाळची न्याहारी भरपूर घ्यावी. रात्रीचे जेवण मात्र अतिशय कमी सेवन करणे आरोग्यास उत्तम असते. त्यामुळे अतिरिक्त वजनवाढ टळते. रात्री भरपूर जेवण केल्याने वजन वाढते.त्याउलट सकाळी केलेल्या भरपूर नाश्त्यातील कॅलरीज दिवसभराच्या कामात खर्च होऊन वजन वाढत नाही. २५ वर्षांपर्यंतच्या तरुणांनी भुकेपेक्षा चार घास जास्त खावेत. प्रौढ व्यक्तींनी भुकेपेक्षा थोडे कमीच खावे.

लक्षात ठेवा – आपल्या शरीराची अन्नाची गरज आणि आपली भूक यांचा संबंध फारच कमी असतो. बैठे काम करणार्‍या प्रौढ व्यक्तींना दिवसाला १५00 उष्मांक लागतात; पण त्यांची भूक मात्र २५00-३५00 उष्मांकांची असते. हे जास्तीचे अन्न मग वजनवाढ, पोट सुटणे किंवा कंबर मोठी होणे या स्वरूपात दिसू लागते. त्यामुळे शरीर बेढब तर होतेच; पण मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराला निमंत्रण मिळते. योग्य आहार, त्याचे यथायोग्य प्रमाण आणि त्या घेण्याच्या योग्य वेळा पाळणे आरोग्याला हितकारक असते.आपला आहार चौरस असावा. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, नत्रयुक्त पदार्थ किंवा प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार आणि जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकांचा समतोल प्रमाणात समावेश असावा. आपले मराठी पद्धतीचे जेवण म्हणजे उत्तम चौरस आहारच असतो. पोळी, भाकरी, भात यामधून आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळतात. भातावर आपण डाळीचे वरण घेतो, त्यात प्रथिने असतात. आपण ज्या भाज्या खातो त्यापैकी मोड आलेल्या धान्याच्या उसळीमध्ये, म्हणजे मूग, मटकी यातसुद्धा प्रथिने असतात. भातावर आपण जर थोडे तूप घेत असाल किंवा पोळीला तेल, लोणी किंवा तूप लावत असाल तर त्यातून स्निग्ध पदार्थ मिळतात. जर आपण दही, दूध किंवा ताक घेत असाल तर त्यातूनही शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात. पालेभाज्या, कोशिंबीर, फळे यातून जीवनसत्त्वे मिळतात. लोणच्यातून क्षार मिळतात. थोडक्यात काय तर आपले साधेसुधे जेवण जर योग्य प्रमाणात घेतले तर त्यातून सर्व अन्नघटक मिळून समतोल आहार मिळतो.

अर्थात जे मांसाहार करतात त्यांना प्रथिने जास्त मिळतात; पण अंडी, मटण, चिकन यातून जेवढी प्रथिने मिळतात, तितकीच उत्तम प्रथिने सोयाबीनसारख्या शाकाहारी पदार्थातूनसुद्धा मिळतात. शाकाहारी कुटुंबांनी गहू दळून आणताना त्यामध्ये दोन भाग गहू आणि एक भाग सोयाबीन मिसळून त्या पिठाच्या पोळ्या बनवल्या, तर त्यांना शाकाहारी आहारातूनही उत्तम प्रथिने मिळू शकतात. आहारामध्ये पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या शरीरात ८0 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो. दिवसातून ८ ते १0 ग्लास पाणी प्रत्येकाला आवश्यक असते. पाणी कमी प्यायल्यास बद्धकोष्ठ, मुतखडा आदी स्वरूपाचे आजार होतात. सतत अस्वस्थ वाटणे, पायात गोळे येणे, चक्कर येणे असे त्राससुद्धा होतात. भरपूर स्वच्छ पाणी पिणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. पाणी पिताना ते दिवसातून दोन-तीन वेळा तांब्या-तांब्याने पिण्याऐवजी ठरावीक अंतराने म्हणजे तासा-तासाला अर्धा ग्लास घेणे अधिक चांगले.