एका डोळ्याचा राक्षस…..

indexबरेचदा रात्री प्रवास करतांना रस्त्यावर ‘एका डोळ्याचा जीवघेणा राक्षस’ दृष्टीस पडतो! तो समोर आल्यावर सुरुवातीला आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही, मात्र थोडे जवळ गेल्यावर त्याची ‘व्याप्ती’ कळते आणि आपण लगेच सावधगिरीने गाडी बाजूला घेतो. दुर्दैवाने काही चालकांना त्याची व्याप्ती कळायला जास्तच उशीर झाल्याने अपघात झाल्याचीही उदाहरणे आहेत.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा राक्षस नेमका कोण आणि आला तरी कुठून?’ मात्र हा कुणी खराखुरा राक्षस नसून काही गाडीचालकांच्या मनातील राक्षसी प्रवृत्ती होय! काही चारचाकी वाहनचालक समोरून येणाऱ्या वाहनाचा विचार न करता आपल्या गाडीच्या बॅटरीतील उर्जा वाचविण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन्ही हेडलाईट लावण्याऐवजी एकच हेडलाईट लावतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकाला, दुचाकीस्वाराला किंवा पायी येणाऱ्याला हे वाहन दुचाकी कि चारचाकी याची कल्पना येत नाही. समोरील वाहन हे दुचाकी वाहन समजून त्याला तेवढीच जागा सोडून समोर जाताच ते चारचाकी असल्याचे लक्षात येते आणि गाडी बाजूला घेण्याची किंवा रस्त्यावरून बाजूला सरकण्याची धांदल उडते. हे करणे जमले तर ठीक, नाहीतर नाहक दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघाताचा प्रकार ओढवतो. त्यामुळे स्वतःसोबत समोरच्याच्याही सुरक्षिततेची काळजी ठेवून चारचाकी वाहनचालकांनी दोन्ही हेडलाईट रात्रीच्यावेळी लावणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून समोरून येणाऱ्या व्यक्तीला वाहनाचा अचूक अंदाज येण्यास मदत होईल आणि असले अपघात टाळता येतील.