एक हात आर्थिक मदतीचा !

imagesकुणाला आर्थिक मदत करण्याबद्दल भिन्न मतप्रवाह असू शकतात, मात्र आर्थिक मदतिचा हात पुढे करणाऱ्या व्यक्ती ह्या समाजात नाहीत असे नाही! कित्येक शाळा-महाविद्यालये, दवाखाने, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, विविध सामाजिक उपक्रम दानशूर व्यक्तींनी केलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर उभे आहेत. आपल्या सर्व गरजा पूर्ण करून जर बरीचशी रक्कम बाजूला राहत असेल, तर त्यातील थोडीफार रक्कम समाजावर खर्च केली तर त्यास काय हरकत आहे? ह्याच भावनेतून आर्थिक मदतीचे असे दानशूर हात पुढे येत असतात. समाजामध्ये वावरतांना ह्या समाजाचे आपणही काही देणे लागतो. ते अशी थोडीफार मदत केल्याने पूर्ण होईल अशी भावना त्यामागे असते.

     आपण केलेल्या आर्थिक मदतीमुळे कुणाच्यातरी जीवनाची गाडी रुळावर येऊ शकते. एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्याला पोटभर अन्न मिळू शकते, उपचाराअभावी मरण मागणाऱ्याच्या जीवाला नवसंजीवनी मिळू शकते, गरीब मुलांना शिक्षण, बेघराला निवारा मिळू शकतो. कदाचित आपण एकट्यानेच केलेल्या मदतीतून एवढे सगळे शक्य वाटत नसले तरीही, आपल्यासारख्या इतर दानशुरांनी मिळून केलेल्या मदतीतून हे शक्य असते.

नुकत्याच एका स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून मुंबईतील कामाठीपुरा सारख्या वेश्यावस्तीत राहणाऱ्या एका मुलीला परदेशी शिक्षणाची संधी मिळाली. जिथे सर्वसामान्य पालकांना आपल्या पाल्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी पाठविणे अशक्य वाटते तिथे वेश्यावस्तीत राहणाऱ्या मुलीची परदेशात शिक्षण घेण्याची काय बिशाद? मात्र, त्या स्वयंसेवी संस्थेमुळे हे सहजशक्य झाले. ह्या स्वयंसेवी संस्था अशाच दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीवर चालत असतात. आपण पुढे केलेला आर्थिक मदतीचा हात एखाद्याच्या अंधकारलेल्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे काम करू शकतो.

मात्र, आपण केलेल्या आर्थिक मदतीचा योग्य विनियोग होतोय अथवा नाही हेही तपासून पाहणे जरुरीचे आहे. आपण अमुक कामाकरिता आर्थिक मदत करायची आणि प्रत्यक्षात त्या पैशाचा उपयोग भलत्याच कामासाठी व्हावा हेही उचित नाही. त्याकरीता, आपण ज्या संस्थेला आर्थिक मदत केली आहे तिला अधून मधून भेट द्यावी, त्यांच्याकडे असणाऱ्या एखाद्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती दर्शवावी, त्या संस्थेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे.