एटीएम सेंटर बाहेर गार्डची व्यवस्था असायलाच हवी….

atm
atm

बंगळूरू मधील मध्यवर्ती ठिकाणावरील एका एटीएम मधील महिलेवरील जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि तितकाच संबंधित बँकेच्या एटीएम सेंटरवरील धोरणाबाबत प्रश्न उपस्थित करणारा आहे. ग्राहकांच्या मदतीसाठी आणि एटीएम सेन्टरच्या सुरक्षेसाठी प्रत्येक एटीएम सेंटरच्या बाहेर एका गार्डची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. तरीही बऱ्याच बँका हा संकेत धाब्यावर बसवून विना गार्ड एटीएम सेंटर चालवितात. आणि संबंधित बँकेच्या ह्याच निष्काळजीपणाच्या शिकार ठरल्या आहेत बंगळूरू येथील ज्योती उदय. जर त्या एटीएम सेंटर बाहेर एखाद्या गार्डची व्यवस्था असती, तर ज्योती उदय यांच्यावरील खुनी हल्ला टाळता आला असता. एटीएम सेंटर हे एक संवेदनशील ठिकाण असते. काही ठिकाणी एटीएम मशीनच चोरी झाल्याचे, ए टी एम मशीनमधील पैसे चोरी गेल्याच्या आणि एखाद्याकडून बळजबरीने एटीएम मधून पैसे काढून चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय इतरही धोके एटीएम सेंटरला असू शकतात.अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक एटीएम सेंटर बाहेर गार्डची व्यवस्था असायलाच हवी.