कच्च्या फणसाची भाजी
|
साहित्य :-
१) एक कच्चा फणस
२) मध्यम आकाराचे कांदे तीन-चार
३) लसूण पाकळ्या आठ-नऊ , आलं पाव इंच
४) सुकं खोबरं पाव वाटी , सुक्या लाल मिरच्या सात-आठ
५) तीळ पन्नास ग्राम , मेथी दाणे अर्धा चमचा
६) धने-जीऱ्याची पूड दोन चमचे
७) काळा मसाला दोन चमचे
८) कोथिंबीर अर्धी वाटी
९) अर्धी वाटीपेक्षा किंचित जास्त तेल
१०) मोहरी , हळद , चवीपुरत मीठ .
कृती :-
१) फणस चिरण हे अतिशय कष्टाचं आणि किचकट काम असतं. हाताला व विळीला गोडतेल लावून फणस चिरावा .
२) तीन कांदे भाजून घ्यावे . सुकं खोबरं , तीळ भाजून घ्यावेत . ग्रेव्हीसाठी मिक्सरवर तीळ-खोबरं , सुक्या मिरच्या , कांदे लसूण , आलं , धने-जिरे , मेथी दाणे वाटून घ्यावे .
३) फोडणी करून त्यावर वाटलेला मसाला परतावा . मसाल्याला तेल सुटू लागलं की चिरलेला फणस घालावा .
४) फोडणीतच हळद घालावी . भाजीला उकळी फुटली की काळा मसाला घालावा . भाजी चांगली शिजवून घ्यावी .
५) भाजी शिजतानाच भरपूर कोथिंबीर त्यात घालावी म्हणजे कोथिंबिरीचा स्वाद त्यात चांगला उतरतो . चवीपुरत मीठ घालावं .
६) भाजी काढल्यावर वरून शोभेसाठी थोडी कोथिंबीर , लिंबाच्या गोल चकत्या पसराव्या .
७) वऱ्हाडात बहुतेक वेळा ही भाजी रसभाजीच करतात . पण पश्चिम महाराष्ट्रात ही सुकी भाजीही करतात .
८) तेव्हा त्यात हिंग , मेथीची पूड , धने-जीऱ्याची पूड हा मसाला वापरतात .