कामाचा ताण……..
|आपल्या मित्रपरिवारात काही नोकरी करणारे मित्रही असतीलच. अशा मित्रांच्या तोंडून एक वाक्य हमखास कानी पडतं, ‘यार, माझ्याशिवाय तिथलं पानही हलत नाही. सर्व लोड माझ्यावरच असतो! बाकीचे नुसतेच बसून असतात.’ मात्र ‘हे कितपत खरं आहे?’ हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केलाय? ‘आपल्याला काय त्याचं?’ असं वाटून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र आपला मित्र असल्या सबबी सांगून मित्रपरिवारातील काही सुख-दुःखाच्या क्षणांना नक्कीच मुकत असतो हे मात्र खरं! अशा मित्राला मनोमन असंच वाटत राहतं की, त्याचे सर्व वरिष्ठ सगळी कामे त्याच्यावरच सोपवितात. सगळा कामाचा प्रेशर त्याच्यावरच येतो. असा मित्र ह्याच भ्रमात राहिल्याने काही महत्वाच्या कौटुंबिक क्षणांनाही त्याला मुकावे लागते.
नोकरी करणाऱ्या बहुतेक लोकांची हीच अवस्था असते. मात्र, ह्यात काही फारसे तथ्य असते असे नाही! हे पडताळून पहायचे झाल्यास अशा मित्राला काहीतरी आकस्मिक अथवा महत्वाचं कारण सांगून किमान आठवडाभर रजा घेण्याचा सल्ला द्या. त्याने खरोखर असे केल्यास, रजेच्या दिवसात स्वतःहून ऑफिसातील सहकाऱ्यांशी संपर्क साधणे बंद करावे आणि ऑफिस परिसरात जाणेही टाळावे असा दंडक आखून द्या. मित्र गैरहजर असतांनाही ऑफिसमधील सुरळीत चाललेली कामे पाहून त्याचा स्वतःवरील कामाच्या ताणाबद्दल असलेला गैरसमज दूर होईल. खरोखरच त्याच्यावर असा ताण असल्यास त्याच्या गैरहजेरीत त्याचे काम इतरांनी वाटून घेतल्याने त्यांनाही कामाची सवय लागेल आणि आपल्या मित्रावरील कामाचा ताण कमी होईल. असे झाल्याने तो मित्र आपल्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात सहजगत्या वावरतांना दिसेल. निष्कारण कामाचा ताण ओढवून घेतल्याने आरोग्यविषयक तक्रारीही डोके वर काढतात. त्यातूनही आपल्या मित्राची सुटका होईल.
बघा असे करून, जमतंय का ते!