कारल्याची भरून भाजी

bharlela karela

साहित्य :-

१)      छोटी कोवळी कारली पाव किलो

२)     तीळकूट चार चमचे

३)     खोबऱ्याची पूड चार चमचे

४)     लाल तिखट दोन चमचे

५)    धने-जीऱ्याची पूड दोन चमचे

६)      खसखस भाजून दोन चमचे

७)    दोन छोटे कांदे चिरून तेलावर परतून

८)     कच्चा मसाला दोन चमचे (एक चमचा धने + तीन-चार लवंगा + एक तुकडा जायपत्री + तीन वेलदोडे + अर्धा चमचा जिरं मिक्सरवर बारीक करून घेऊन ती पूड)

९)      चिंच-गुळाचा कोळ अर्धी वाटी .

कृती :-

१)      आदल्या रात्री किंवा करण्याच्या दोन दिवस आधी कारली सोलून त्याचे बरोबर दोन भाग करावेत .  दोन्ही टोकाकडील भाग काढून टाकावेत .

२)     आतल्या बिया काढून टाकाव्यात .  नंतर कारल्यांना मीठ व हळद लावून काही वेळ तसंच ठेवावं .

३)     साधारण दोन तासांनी कारली व्यवस्थित पिळून घ्यावीत .  ज्यांना त्याचा कडवटपणा आवडत असेल त्यांनी कमी पिळावीत .

४)     पिळलेली कारली पसरून घेऊन त्याच्या खोलगट भागात तीळकूट , खोबऱ्याची  पूड , खसखशीची पूड , धने-जिरे पूड , कच्चा मसाला , कांदा परतलेला व कोथिंबीर यांचं मिश्रण त्यात भरावं .

५)    चवीपुरतं मीठ व हळदही घालावी .  मोठया पसरट भांड्यात तेलाची फोडणी करून त्यात कारली घालावीत .

६)      मंद आचेवर भाजी शिजू द्यावी व शिजतानाच त्यात चिंचगुळाचा कोळ घालावा .

७)    कारल्याचे जर दोन भाग करायचे नसतील तर कारल्याच्या पाठीवर एक छेद देऊन आतल्या बिया काढून टाकून साधारणपणे कारली पिळून घ्यावी .

८)     कारल्याम्ध्ये वरील मसाला भरून मसाला बाहेर येऊ नये यासाठी कारलं दोऱ्यानं बांधून ठेवावं .  रश्श्यासाठी कढईत फोडणी करून त्यात तीन-चार वाट्या पाणी घालावं .

९)      पाणी उकळत असतानाच त्यात तिखट , मीठ , कोथिंबीर , चिंच-गुळाचा कोळ घालावा .

१०)   रश्श्याला दाटपणा येण्यासाठी थोडंसं म्हणजे दोन छोटे चमचे डाळीचं पीठ व तीळकूट त्यात घालावं .

११)    रश्श्यात बांधलेली कारली मऊ होईपर्यंत शिजू द्यावी .  सगळी कारली शिजल्यावर त्यावर बांधलेला दोरा कापून टाकावा .