काळा पैसा…..

kala paisaस्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये  लपविल्याचा संशय असणाऱ्या भारतीयांची यादी तेथील सरकारने तयार केली असून, ती लवकरच भारत सरकारला देण्यात येणार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या या निर्णयामुळे काळ्या पैशांविरोधात भारत सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना मोठे बळ मिळणार आहे.

स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये पैसा ठेवणाऱ्या खातेदारांची खरी ओळख आणि माहिती घेण्यासाठी तेथील सरकारने सुरू केलेल्या या मोहिमेत काही भारतीय व्यक्तींची आणि संस्थांची नावे बाहेर आली आहेत, अशी माहिती येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
या व्यक्ती अथवा संस्थांनी कर चुकवून विश्‍वस्त संस्था, स्थानिक कंपन्या आणि भारताबाहेरील इतर कायदेशीर संस्थांच्या नावे स्विस बॅंकांमध्ये पैसा ठेवला असण्याची शक्‍यता आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या व्यक्ती आणि संस्थांची नावे, तसेच त्यांनी ठेवलेली रक्कम सांगण्यास मात्र या अधिकाऱ्याने नकार दिला. दोन देशांमध्ये असलेल्या द्विपक्षीय करारानुसार अशी माहिती उघड करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात नव्याने आलेल्या सरकारबरोबर काम करण्यास स्वित्झर्लंड सरकार उत्सुक असून, काळ्या पैशांबाबत भारतात स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाला शक्‍य तेवढी मदत करू, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. स्विस बॅंकांमध्ये भारतीयांनी हजारो कोटी डॉलर काळा पैसा ठेवल्याच्या दाव्याचा मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. स्वित्झर्लंडमधील 283 बॅंकांमध्ये विदेशी ग्राहकांनी ठेवलेला एकूण पैसा 1.6 हजार कोटी डॉलर असल्याचे स्विस नॅशनल बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकात म्हटल्याचे त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.