“ खरी श्रद्धांजली ”

indexआज २६ नोव्हेंबर, सार्वभौम भारतावरील सर्वात मोठ्या अतिरेकी हल्ल्याला आज पांच वर्ष पूर्ण होत आहेत. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून तर उच्च पदस्थ राजकारण्यांपर्यंत सर्वचजण दरवर्षी आजच्या दिवशी त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांविषयी सहानुभूती व्यक्त करतात. त्यांना आणि हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि जवानांना श्रद्धांजली वाहतात.

मात्र एवढे पुरेसे आहे? हल्ल्यात गमावलेल्या नागरिक, पोलीस आणि जवानांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबात तयार झालेली पोकळी आपण भरून काढू शकतो? केवळ एखादे पदक आणि थोडेफार पैसे देऊन त्यांच्या वीरमरणाचा सन्मान होऊ शकतो? दरवर्षी आजच्या दिवशी त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहून कृतज्ञता संपते? नाही, मुळीच नाही! ह्या हल्ल्यातील जिवंत पकडला गेलेला एकमेव आतंकवादी अजमल कसाबला फासावर लटकावूनही आपण ह्या हल्ल्याचा बदला घेतला असे होत नाही.

ज्या शेजारी राष्ट्रात ह्या हल्ल्याचा कट शिजला, त्या राष्ट्रात ह्या हल्ल्याचे खरे सूत्रधार आजही मोकाट फिरत आहेत. त्या सूत्रधारांना पकडून जोपर्यंत फासावर लटकावले जात नाही, भारतावर वारंवार होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांना मदत करणाऱ्या शेजारी राष्ट्राला जोपर्यंत कायमची अद्दल घडविली जात नाही तोपर्यंत ‘२६/११’च काय, कुठल्याही अतिरेकी कारवाईला आपण चोख प्रत्युत्तर दिले असे म्हणता येणार नाही. शेजारी राष्ट्राला अशी अद्दल घडविली पाहिजे, कि त्या राष्ट्रातील येणाऱ्या पुढच्या पिढ्या भारताकडे वाकडी नजर करून बघायची हिम्मतही करू शकणार नाही! आणि तीच अशा हल्ल्यात गमावलेल्या नागरिक आणि जवानांना खरी श्रद्धांजली असेल!

२६/११/२००८ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिक आणि ह्या हल्ल्याला चोख उत्तर देतांना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचारी, लष्करी आणि एन.एस.जी. जवानांना ‘m4मराठी’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!