गरजवंताची भागेल गरज, देणाऱ्याला मिळेल समाधान……

indexलिखाणकामासाठी पेनाची प्रत्येकालाच आवश्यकता असते. बऱ्याचदा आपण पेनाची रीफील संपल्यानंतर नवीन रिफील टाकण्याऐवजी पेनच विकत घेतो. जुने पेन मग तसेच अडगळीत पडते. सणावाराला घराची साफसफाई करत असतांना असे बरेच पेन मिळून येतात. हे सर्व एकतर भंगारात जाते किंवा कचरा म्हणून फेकून देण्यात येते. मात्र समाजातील कित्येक गरीब विद्यार्थी अशा चांगल्या प्रतीच्या पेनांपासून वंचित असतात याची आपल्याला बिलकुल जाणीव नसते. अशा अडगळीत पडलेल्या पेनांना एकत्र करून जर त्यात रीफील भरली आणि गरजू गरीब विद्यार्थ्यांना वाटली, तर त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच कृतज्ञतेचे हसू उमटेल आणि आपल्यालाही आपल्या वस्तू सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.

हे नुसते पेनाचेच झाले, अशा कितीतरी वस्तू असतात ज्या आपण काही दिवस वापरल्यानंतर बाजूला टाकतो अथवा त्या आपल्या निरुपयोगी होतात. मात्र त्या वस्तू कुणाच्यातरी नक्कीच कामात येऊ शकतात. अशा वस्तू ज्याची इच्छा असूनही तो खरेदी करू शकत नाही त्याला दिल्या तर नक्कीच त्याची गरज पूर्ण होईल आणि आपण कुणाच्यातरी कमी आलो याचे समाधान आपल्याला लाभेल!