गरजशैक्षणिक व्यवस्थापन
|काळाची गरजशैक्षणिक व्यवस्थापनआज शिक्षण हासुद्धा एक उद्योग मानला गेल्याने त्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक ठरते. शिक्षणप्रक्रियेत शिक्षणाची ध्येये, धोके, नियोजन, संघटन, संचालन, नियंत्रण, मूल्यमापन आदी बाबींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे शासन, समाज, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, पालक व विद्यार्थी इत्यादी मानवी घटक व भौतिक साधनसामग्रीचा संबंध शिक्षण क्षेत्राशी येत असतो. या सर्व घटकांचे उत्तम व्यवस्थापन होणे ही काळाजी गरज आहे. यालाच शैक्षणिक व्यवस्थापन म्हटले जाते.
सध्याच्या लोकशाही जमान्यात शिक्षण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. भावी पिढीचा शिल्पकार म्हणून ज्या शिक्षकांचा समाजात निर्देश केला जातो, त्या शिक्षकांची उभारणी एका मजबूत अशा व्यवस्थापनाच्या पायावर अवलंबून असते. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असायला हवे. शिक्षक आपल्या व्यवसायावर परिपूर्ण असेल तरच जीवनातील आव्हाने पेलणारा तो विद्यार्थी निर्माण करू शकेल यात शंका नाही. याचा विचार करता शिक्षकाला शिक्षण महाविद्यालयातच शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सर्व अंगांची परिपूर्ण माहिती हवी. तसेच शिक्षणाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमात शैक्षणिक व्यवस्थापन हे उद्दिष्ट उपलब्ध व्हायला हवे. शिक्षण आयोगामध्ये शिक्षकांच्या कार्याबाबत चार प्रमुख बाबी सांगितलेल्या आहेत. त्यात शिक्षकाने आपल्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवत राहावे, त्याचे उत्तम व्यवस्थापन करावे, आपल्या विषयात विविध समस्यांवर संशोधन करावे आणि त्या संशोधनातून, तसेच विविध उपक्रमांतून शिक्षणात बदल घडवून आणावेत. शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा व्हावयास हवी. त्यासाठी शाळांचे नियोजन व प्रशासन उत्कृष्ट असावयास हवे. शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे शैक्षणिक धोरणांचा विकास करणे, अध्ययन-अध्यापनाच्या कार्याला प्रेरणा देणे व शिक्षण प्रक्रियेतील मानवी व भौतिक घटकांची सुव्यवस्था करणे होय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सार्याच क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. झपाट्याने घडून येणार्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय बदलांमुळे व्यवस्थापनाचे कार्यक्षेत्र सातत्याने विस्तारत आहे. या प्रक्रियेशी संबंधित असणार्या नवनवीन समस्यांना व आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापन होय.
शिक्षण प्रणालीमध्ये प्रश्नांचे स्वरूप सतत बदलत असते. त्यामुळे सर्वच घटकांनी जागृत असणे आवश्यक असते. शैक्षणिक व्यवस्थापन हा विषय निव्वळ तात्त्विक माहिती मिळवून ती ग्रहण करण्याचा नसून शैक्षणिक तंत्र आणि मंत्र यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आहे. शिक्षणातील सर्वांगीण गुणवत्ता वाढवून त्याचे संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थापनच महत्त्वाचे ठरणार आहे.