गुटखाबंदी कायम

gutkha
राज्यात गेल्या दोन वर्षापासून गुटख्यावर घातलेली बंदी तिसऱ्या वर्षीही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
तीन वर्षांपूवी देशात अन्नसुरक्षा व मानके कायदा लागू झाल्यानंतर या कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने काही राज्यांनी त्वरित गुटखा- पानमसाला बंदी लागू केली, त्यात महाराष्ट्र आघाडीवर होते. आजच्या घडीला देशातील त्रिपुरा व मेघालय ही दोन राज्ये आणि पॉंडिचेरी व लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अशी बंदी लागू केली आहे; परंतु गुटखा आणि पानमसाल्यांबरोबरच सुगंधी, स्वादिष्ट सुपारी व तंबाखूवरही बंदी घालणारे महाराष्ट्र हे गेल्या वर्षी पहिले राज्य ठरले आणि आजही तसे एकमेव राज्य आहे. याशिवाय बंदीच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यातही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. “महाराष्ट्र एफडीए‘ने दोन वर्षांत तब्बल 67 हजार 914 ठिकाणी छापा कारवाई करत 36 कोटी 15 लाखांचा माल जप्त केला, त्यापैकी 24 कोटी 53 लाख रुपयांचा माल नष्ट केला असून, उर्वरित माल भविष्यात नष्ट केला जाणार आहे. जप्तीच्या कारवाईसह एक हजार 212 प्रकरणांत “एफआयआर‘ नोंदवला आहे. महाराष्ट्राची ही सर्व कारवाई देशातील अन्य सर्व राज्यांची एकत्रित केली तरी अधिक आहे, असे एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.

One Comment