गोऱ्या वर्णाचे महत्व अवास्तव…..

imagesहल्ली सौंदर्याला विशेष महत्व आहे. त्यातही व्यक्तीच्या रंगला विशेष महत्व. त्यामुळेच नवनव्या आणि गोरेपानाची हमी देणाऱ्या फेयरनेस क्रीम्स ची मार्केटमध्ये चंगळ आहे. पूर्वी फक्त ‘स्त्री’च गोरी असण्याकडे लक्ष दिले जायचे. आता, मात्र पुरुषांच्याही गोरे असण्याचे महत्व वाढले आहे. त्यामुळेच की काय आता बाजारात स्त्रियांसोबतच पुरुषांकरिता फेयरनेस क्रीम ही उपलब्ध आहे. पूर्वी असे म्हटले जायचे की स्त्रीचे सौंदर्य तिच्या दिसण्यात आणि पुरुषाचे सौंदर्य त्याच्या कर्तृत्वात म्हणजेच मनगटात असते. आज मात्र ही म्हण पूर्णतः बदलेली दिसते. गोऱ्या रंगाचे अवास्तव आकर्षण आहे हेच खरे.

हे आकर्षण प्रत्येकठिकाणी लोकांच्या आपापसातील वर्तणुकीतून लक्षात येते. गोऱ्या व्यक्तींना मिळणारा प्रतिसाद हा सावळ्या किंवा काळ्यासावळ्या व्यक्तींना मिळणाऱ्या प्रतिसादापेक्षा कितीतरी अधिक असतो. त्यातूनच मग काळ्यासावळ्या व्यक्तींमध्ये आपल्या रंगबाद्दलचा न्यूनगंड वाढत जातो. मात्र हा न्यूनगंड बाळगण्याचे काही कारण नाही. कारण, आपल्या देशातील जवळ-जवळ नव्वद टक्के जनता ही काळ्या-सावळ्या वर्णाची आहे आणि असणारच, कारण आपला भारत देश हा उष्ण कटिबंधात येणारा देश आहे.