गोष्ट तिची… लग्ना आधी.. नंतरची!!!
तुमची माझीच जणू
| नव्हती येत पोळी बिळी
भाजी नव्हती कधीच चिरली
नखात जाते म्हणून कधीही
लसूण पाकळी नव्हती सोलली!!
माहीत नव्हते घर एवढे
स्वच्छ नेटके कसे दिसते
अंगणात झाडावरती
सुंदर फुल कसे उमलते!!
नाही पडला प्रश्न कधीही
ड्रेस महागडा कसा घ्यायचा
पार्टी सिनेमा सहल एखादी
हट्ट माझा सहज पूर्ण व्हायचा!!
उठले नव्हते कधीच लवकर
ताई द्यायची चहा आयता
टीव्ही समोर बसून कितीदा
रविवार साजरा झाला होता
आला कधी ताप खोकला
औषध देण्याचा नेम बाबांचा
खिचडी लापशी घेऊन हाती
पाठीवरती हात आईचा!!!
होता तसा धाक भीतीही
पण विषय नव्हता चिंतेचा
शाळा काॅलेज मित्र मैत्रीणी
स्वप्न आणि धुंद क्षणांचा!!
आता ऐका गोष्ट पुढची….
आता ऐका गोष्ट पुढची
बाज बदलत्या पर्वाचा
झाले लग्न वाजत गाजत
ऋतू गुलाबी सुरूवातीचा!!! !
आले हळूच भानावर मी
चंद्र चांदणे कुठे हरवले
धाक लागला सूर्याचा त्या
दिसामाजी मी पळू लागले!!
अल्लड अवखळ मुक्त छान ते
दिवस केव्हाच मागे पडले
कर्तव्य जबाबदारी ला मी
समजदारीने बांधून घेतले!!!
तिखट मीठ निवडणे टिपणे
किचन म्हणजे दिव्य कळले!!
रांधा वाढा उष्टी काढा
नाही म्हणता मीही केले!!
कण्हत कुथत मी भांडे घासले
आवडीने घर सजवले
कधी धुतले धुणे धपाधप
दोरीवर माझे स्वप्न सुकवले!!!
मर्जी राखली याची त्याची
माझे मन मी सदा मारले!!
लग्नानंतर लेकीचे लाडक्या
पहा कसे हो सर्व बदलले!!
नवरा वागतो नवऱ्या सारखा
त्याचे कधी काही न चुकले
संसाराच्या तडजोडी मी
अनायास सारे शिकले!!
नाही म्हणता मी मनासारखे
कधी कधी आता वागते
पण क्षणात येते भानावरती
घर दार सारे मी आठवते!!!
आहे सुखात आता तशी मी
तरी काही तरी खूप बोचते
निवांत मोकळे क्षण माहेराचे
आता नाही हेच कळते!!!
-कवी अज्ञात
