चंद्रपूर जिल्ह्यातील वैभवीचा युनिसेफच्या नवज्योती पुरस्काराने सन्मान…

vaibhavi1अल्पवयीन मुलींचे बालविवाह आणि त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात अल्पवयीन मुलींमध्ये जनजागृती करण्याचे काम युनिसेफच्या ‘दिपशिखा’ ह्या योजनेअंतर्गत केले जाते. दीपशिखा ह्या शब्दाचा अर्थ ‘सतत प्रकाश देणारा’ असा होतो. चंद्रपूर जिल्ह्यात ह्याच प्रोजेक्ट अंतर्गत काम करणाऱ्या एका युवतीने हे नाव सार्थकी लावण्याचे काम करून दाखविले आहे.

कुठलेही चांगले काम उभे करण्यासाठी कुणी दुसऱ्याने प्रेरित करण्यापेक्षा स्वतःच प्रेरित होणे जास्त महत्वाचे असते. अशाने उल्लेखनीय काम उभे राहते. त्यातच स्वतःसोबत घडलेली एखादी अन्यायकारक घटना आपल्याला त्याविरोधात काम करण्याची प्रेरणा देत असेल तर?

वैभवी उलमाले! वय वर्ष १८. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदूर गावातील रहिवासी. दहावी पास झाली आणि जवळच्या गावात संगणक हा क्लास लावला. क्लासला जातांना एक ५५ वर्षीय विकृत मनोवृत्तीचा माणूस तिची छेडछाड करायचा. सुरवातील निमुटपणे सगळे सहन केल्यावर एक दिवस तिचा सय्यम सुटला आणि तिने स्वताच त्याला कायमचा धडा शिकविला. मात्र तिचा लढा एवढ्यावरच थांबला नाही. लहान मुलींवर होणारे अन्याय-अत्याचार, छेडछाड, बालविवाहाविरोधात तिने लढा सुरु केला आहे. आपल्याच वयाच्या मुलींना संघटित करुन तिने महिलांच्या सन्मानासाठी लढा सुरु केला आहे. याच कामाची दखल घेऊन युनिसेफने तिला “नवज्योती पुरस्कारा”ने सन्मानित केलं आहे.
याच दरम्यान ती प्रत्येक जिल्ह्यात चालवल्या जाणाऱ्या युनिसेफच्या दीपशिखा प्रोजेक्टसोबतही जोडली गेली. या प्रकल्पाअंतर्गत बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी वाटणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन केलं जातं.
वैभवीचं हे काम सुरु असतानाच आणखी एका घटनेने तिने गावाचा रोष ओढवून घेतला होता. एका अल्पवयीन मुलीचं लग्न तिने पोलिसांचा धाक दाखवून मोडीत काढलं. वैभवीला आज फक्त तिच्या गावातच नाही तर आजूबाजूच्या गावातही आदराने पाहिलं जातं.  वैभवी चंद्रपूरमध्ये डी.एडचं शिक्षण घेत आहे. त्यासोबतच तिचा महिलांच्या सन्मानाचा लढाही सुरु आहे. गावागावात अशा वैभवी पुढे आल्या तर मुलींकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही.