चारित्र्य

index     ‘चारित्र्य’ हि प्रत्येक माणसाची ओळख असते आणि असलीच पाहिजे. आपण कसे वागतो, बोलतो, आपला कौटुंबिक-सामाजिक व्यवहार कसा आहे, आपले आर्थिक व्यवहार कसे आहेत यावरून आपले चारित्र्य कसे आहे याचा अंदाज इतरांना येत असतो. आपण स्वतःकडे जेवढे लक्ष देतो त्याहूनही अधिक इतर लोक आपल्याकडे लक्ष देत असतात. फरक एवढाच असतो कि आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःकडे लक्ष देतो, तर इतर लोक आपले परीक्षण करतात.

एखादे व्यसन करणे वा मद्यपान करणे हा ज्याचा त्याचा व्याक्रिगत प्रश्न. आजकाल तर एखादेतरी व्यसन असणे हा बहुदा आजचा ट्रेंडच बनला आहे. त्याकरीता आपण काय व्यसन करतो, कुठे करतो याचेही संकेत डावलले जातात. यामुळे आपल्या चारित्र्याविषयी इतरांचे वाईट मत बनते याचाही त्यांना विसर पडतो. ‘कुणी बघतोय तर बघू देणा! आपल्याला काय त्याचे’ असे म्हणून सोयीस्करपणे कानाडोळा केला जातो. मात्र, ह्या गोष्टी नंतर आपल्याच अंगलट येतात.

कुठलीही व्यक्ती हि कुटुंबवत्सल असायला हवी. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या गरजा, दुखणे-खुपणे यावर लक्ष असायला हवे. महत्वाचे सण-समारंभ, काही महत्वाच्या प्रसंगावेळी आपण आपल्या कुटुंबासमवेत असायला हवे. एखाद्या अडचणीच्या प्रसंगात कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहायला हवे.त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणेही महत्वाचे आहे. समाजातील सुख-दुःखात सहभागी व्हावे, सार्वजनिक उपक्रमात सहभागी व्हावे, शक्य असल्यास आर्थिक मदत करावीही.

आपले आर्थिक व्यवहारही चोख असायला हवे. आपण कुणाचे देणे लागत असल्यास ते वेळचेवेळी परत करावेत. उशीर होणार असल्यास संबंधिताकडून तशी वेळ मागून घ्यावी. काही लोकांना कुणाचे पैसे द्यावयाचे असेल आणि सध्या त्यांच्याकडे द्यायला पैसे नसतील तर संबंधितांना तसे न कळविता ते त्यांना भेटनेही टाळतात. त्यांचा फोन येईल म्हणून फोन बंद करून ठेवतात किंवा फोन उचलणेही टाळतात. यामुळे आपल्या चारित्र्याविषयी शंका उत्पन्न होते. बहुतकरून आपल्या चारित्र्याविषयी चांगले वा वाईट मत आपल्या आर्थिक व्यवहारांवरूनच बनत असते.

चांगले चारित्र्य हा प्रत्येकाचा एक महत्वाचा दागिना आहे. ते जपणे आपल्याच हातात आहे. त्याला तडा जाईल असे कुठलेही कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची सतत काळजी घेतली पाहिजे!