चिवळीची भाजी
|(चिवळ ही एक प्रकारची पालेभाजी आहे . ती नाजूक बारीक पानांची असून चवीला आंबटसर असते . देठ लालसर आणि नाजूक असल्यामुळं कोवळी देठही भाजीसाठी घेतात . चिवळ मराठवाड्यातही मिळते .)
साहित्य :-
१) एक जुडी चिवळ
२) डाळीचं पीठ पाव वाटी
३) तेल पाव वाटी
४) फोडणीचं साहित्य
५) चवीपुरतं मीठ
६) हिरव्या मिरच्या तीन-चार .
कृती :-
१) चिवळ निवडून धुवून बारीक चिरून घ्यावी . कढई किंवा पसरट भांड्यात तेल गरम करून फोडणी करून घ्यावी .
२) मिरच्यांचे तुकडे करून फोडणीतच टाकावेत . नंतर त्यात चिवळीची भाजी परतावी . तीन-चार मिनिटांनी भाजीत चवीपुरतं मीठ टाकावं .
३) मीठ टाकल्यावर परत दोन मिनिटं परतावी म्हणजे भाजीला पाणी सूटत . भाजी पटकन शिजते .
४) नंतर त्यावर डाळीचं पीठ पेरावं . पीठ पेरताना हळूहळू भुरभुरत एकीकडं हलवत राहावं म्हणजे गुठळ्या न होता भाजी हलकी व मोकळी होते .
५) काही वेळा फोडणीत तीन-चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात . त्याचा स्वाद छान येतो .