चेन्नकेशव मंदिर

Chennakesava-Templeकर्नाटकमध्ये हसनपासून २५ कि.मी.वरील बेलूर मंदिर हे यगची नदीच्या तिरावर वसलेले आहे, तर हळेबीड बेलूरपासून १५-१६ कि.मी.वर आहे.

होयसळ राजांनी एकूण ९२ मंदिरे बांधली. त्यापैकी सोमनाथपूरम, बेलूर व हळेबीड ही महत्त्वाची मानली जातात. ‘होयसळ’ हे प्रथमत: चालुक्य राजांचे मांडलिक होते, परंतु १२व्या शतकात त्यांनी हे मांडलीकत्व झुगारून दिले व ते स्वतंत्र राजे झाले. त्यांनी मंदिरे बांधताना चालुक्यशैलीतून काही गोष्टी घेतल्या असल्या तरी मूर्ती आणि अलंकार यांच्याबाबतीत नवे तंत्र वापरले. मंदिरावर कारागिरी करण्याच्या दृष्टीने त्यांना त्या परिसरात संगजिर्‍याचा दगड मिळाला, जो वाळूच्या दगडापेक्षा किंवा काळय़ा कातळापेक्षा जास्त संस्कारक्षम होता. या मंदिरांच्या शैलीला ‘होयसळ शैली’ असेच नाव आहे. होयसळ राजांनी निर्माण केलेल्या मंदिरांमध्ये सर्वात सुंदर मंदिर आहे.

मंदिराचे काम पूर्ण व्हायला १0३ वर्षे लागली. या मंदिराच्या भोवती एक दगडी तट आहे. महाद्वारावर जे विटांचे गोपूर आहे, ते नंतरच्या काळात बांधलेले असावे. तिथून आत शिरल्यावर फसरबंदी अंगण लागते. ते स्वच्छ व प्रशस्त आहे. त्याच्या उजव्या बाजूला पुष्करिणी आहे, तर डाव्या बाजूला कप्टोचिन्निगरायाचे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या पायर्‍यांजवळ छोटी छोटी मंदिरे आहेत. चेन्नकेशवाच्या मुख्य मंदिराचा घाट वेगळाच असून, त्याला कळस नाही. मंदिर चौथर्‍यावर उभे असले, तरी तो चौथरा चौकोनी नाही. त्याला आत-बाहेर गेलेले अनेक कोन आहेत. ही बांधणी तारकाकृती आहे . मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असून, दक्षिणेला व उत्तरेला आणखी दोन दारे आहेत. प्रवेशद्वार शिल्पाकृतींनी खच्चून भरलेले आहे. ३ फूट उंच प्लॅटफॉर्मवर असलेले मुख्य मंदिर सुमारे पावणेदोनशे फूट लांब व दीडशे फूट रूंद आहे. त्याच्या भिंतीवर अनेक शिल्पाकृती आहेत. सर्वात तळाशी हत्तींची मालिका, मग मण्यांसारख्या रचनेची ओळ, नंतर रामायण-महाभारतातील प्रसंग, यक्षांच्या व अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पूर्व द्वारातून आत शिरताना रती-मदनाचे युग्म दृष्टीला पडते. त्याच्या वरच्या बाजूला हिरण्यकश्यपूचा वध करणारा नरसिंह आहे. उजव्या बाजूच्या भिंतीवर विष्णुवर्धन राजाचा दरबार भरलेला आहे.

हे मंदिर तीन विभागांचे आहे. गर्भगृह, अंतराळ आणि नवरंग (म्हणजे सभामंडप). हा नवरंग अनेक खांबांवर उभा आहे. त्यापैकी मधले चार खांब सोडले तर बाकीचे सगळे शिल्पाकृतींनी सजलेले आहेत. त्यातही नरसिंह व मोहिनीस्तंभ विशेष आकर्षक वाटतात. नरसिंह स्तंभावर उभ्या-आडव्या ओळीत कोनाड्यांसारखी रचना असून, प्रत्येक कोनाड्यात छोटी देवमूर्ती आहे. देवतांचे हे साम्राज्य वेगळे वाटते. मोहिनीस्तंभावर देव व दानव यांना सुधा व सुरा वाटणारी मोहिनी आहे. तिचे हात छिन्नविच्छिन्न झाले असले, तरी बाकीची मूर्ती सुस्थितीत आहे. नवरंगाचे छतही आकर्षक आहे. ते अष्टकोनी असून, त्यावर घुमट आहे. छतातून एक कमळकलिका खाली येत असून, तिला ब्रह्म, विष्णू, महेश आधार देत आहेत. हे मंदिर मदनिकांच्या किंवा अप्सरांच्या शिल्पाकृतींसाठी प्रसिद्ध असून, इथे एकूण ४२ अप्सरा कोरलेल्या आहेत. त्यापैकी ३८ रमणी बाहेरच्या भिंतीवर लहानसहान खांबांवर आहेत, तर चार आतल्या बाजूला मंदिराच्या छताला आधार देणार्‍या चार स्तंभांवर आहेत. काळय़ा पाषाणातील या मदनिका विलक्षण रेखीव व बोलक्या आहेत. हे शिल्पसौंदर्य पाहून आपण चकित होतो. या मंदिराचा शिल्पकार जव्कपाचार्य यांच्या तीन पिढय़ा हेच काम करत होत्या, असे म्हणतात.

मंदिराच्या दाराशी जय-विजय, अष्टदिक्पाल यांच्याबरोबर गरुडाची पंख असलेली, हात जोडलेली मूर्ती आहे. आत नृत्यगृह आहे. देवीची सेवा करण्याकरिता शंतलादेवी राणी तिथे नृत्य करत असे. या नृत्यगृहाच्या चार कोपर्‍यांत चार नर्तकी कोरलेल्या आहेत. काही खांब पाच भाग असलेले पंचशीलास्तंभ आहेत.

गाभार्‍यातील पुरुषभर उंचीची चेन्नकेशवाची मूर्ती रेखीव व गोंडस आहे. मूर्तीभोवती प्रभावळ असून, तिच्यामध्ये दशावतार कोरलेले आहेत. गाभार्‍यातील मंद प्रकाशात या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते आणि मंदिरातून बाहेर पडूच नये असे वाटत राहाते. मार्च, एप्रिलमध्ये चन्नकेशव मंदिरातील रथयात्रा असते. हसनहून तेथे जाण्यासाठी टॅक्सी मिळू शकते. हसनला निवासाच्या सोयीही बर्‍याच आहेत.