चोवीस तास चालणाऱ्या कार्टून कार्यक्रमांमुळे मुलांवर चांगले संस्कार करण्यात येते बाधा…

images           एकदा मी माझ्या मित्राच्या घरी त्याला भेटायला गेलो. दिवाणखान्यात गप्पा मारायला बसलो असतांना त्याचा पांच-सहा वर्षांचा मुलगाही तिथेच टी.व्ही. बघत बसला होता. कुठला तरी कार्टून कार्यक्रम पहात होता तो. सहज लहान मुलांना कौतुकाने विचारतात म्हणून मी त्याला त्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता वगैरे प्रश्न विचारू लागलो. मात्र, तो त्याकडे नीट लक्षच देईना! म्हणजे तो उत्तर देत नव्हता असे नाही, मात्र त्याचे तोंड काही टी.व्ही. सोडायला तयार नव्हते. खूप उशिराने, थांबत थांबत काहीशा कंटाळवाण्या स्वरातच तो उत्तर देई. यावरून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले.

लहान असतांना शाळेत आमच्याकडून रोज ‘रामरक्षा’ म्हणून घेतली जाई. काही दिवसानंतर रामरक्षा मला अगदी तोंडपाठच झाली. ह्या गोष्टीचे माझ्या आजोबांना फार कौतुक! आमच्याकडे येणाऱ्या एखाद्या पाहुण्याने मला नाव, शाळा, इयत्ता वगैरे प्रश्न विचारले कि आजोबा लगेच त्यांना सांगत, ‘त्याला रामरक्षा तोंडपाठ आहे! म्हणून दाखव बरं बाळ!’ मग मीही पाहुण्यांकडून ‘शाबासकी मिळणार’ ह्या आनंदात रामरक्षा म्हणत असे.

आता मात्र ते दिवस राहिले नाहीत. आजकालच्या लहान मुलांना टी.व्ही.वरील कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कशांत रसच राहिला नाही. कार्यक्रम बघत असतांना मोठी माणसे काय विचारतात, काय बोलतात, काय सांगतात याकडेही लक्ष द्यायला त्यांचे मन तयार नसते. यामुळे मुलांवर चांगले संस्कार करतांना बाधा येते असे माझे स्पष्ट म्हणणे आहे! कार्टून कार्यक्रमात तर मुले इतकी हरवून जातात कि त्यांना इतर कशाचेच भान राहत नाही. असे कार्यक्रम बघायला पालकांनी मज्जाव केला अथवा कार्यक्रम मधेच बंद केला तर मुले लगेच चिडतात. वारंवार असे घडल्याने मुलांचा स्वभाव चिडखोर होतो आणि ते मोठ्यांचे ऐकेनासे होतात. बरं, चोवीस तास कार्टून कार्यक्रम दाखविणाऱ्या वाहिन्याही आता सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तर अडचणीत अजूनच जास्त भर पडलीय! हे कार्यक्रम टीव्हीवरून बंद व्हावेत ह्या मताचा मी नाही. त्यातून काही चांगल्या बोधपर गोष्टीही दाखविल्या जातात. मात्र त्याच्या निश्चित वेळा जरूर असाव्यात. म्हणजे मुले इतर गोष्टींकडेही वळतील. खेळ, अभ्यास, अध्यात्मिक आणि इतर संस्कार यासाठी पालकांना वेळेचे नियोजन करता येईल.

 

4 Comments