जगत जननी गाय म्हणजेच ‘गोमाता’….!
|भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्मियांच्या भावनेनुसार गाय ही केवळ चार पायांची, दोन शिंगांची, शेपटी असलेली, दुध देणारी प्राणी नसून ती समस्त विश्वाची ‘जगत जननी आई’ आहे. गाईच्या शरीरात तेहतीस कोट देवांचा वास असल्याची श्रद्धा हिंदू धर्मियांची आहे.
असे मानण्यामागे कित्येकांना अंधश्रद्धा वाटत असली, तरीही त्याला काही शास्त्रीय आधार देखील आहेत. गायीचं दुध पौष्टिक असून ते ‘पूर्णान्न’ म्हणून मान्यताप्राप्त आहे. नवजात अर्भकाची आई जर त्याला दुध पाजण्यास असमर्थ असली, तर अशा अर्भकाला गायीचं दुध पाजून त्याचा जीव वाचविला जातो. ज्या नवजात अर्भकाला स्वतःच्या आईच्या दुधाशिवाय इतर दुध, पाणी अथवा अन्य पदार्थ पचविणं अशक्य असतं, तेच अर्भक गायीचं दुध लीलया पचवीतं. तेही एखाद्या अमुक गायीचं दुध अमुक बाळाला पाजलं तरच ते पचेल असे नाही, तर कोणत्याही बाळाला कोणत्याही गायीचं दुध पाजलं तरी त्या बाळाला ते दुध पचतं. म्हणूनच गायीला साऱ्या ‘विश्वाची जननी-आई’ म्हणून संबोधलं गेलं आहे.
गायींच्या सहवासात राहिल्याने दमासारखा आजार दूर राहतो. गायीच्या शेणाने सारवलेल्या जागेवर आपला अनवाणी वावर असला तर रक्तदाबाचा त्रास जाणवत नाही. गायीचे मूत्र म्हणजेच ‘गोमुत्र’, जे अनेक धार्मिक कार्यक्रम प्रसंगी वापरले जातं, त्याचा वापर फक्त तेवढ्या पुरता मर्यादित नाही, तर हेच ‘गोमुत्र’ एक उत्तम प्रतिचं रोगप्रतिकारक मान्यताप्राप्त आहे. मुख्यकरून गाय शेतकरी पाळतो. गायीच्या मल-मुत्रापासून उत्तम प्रतीचे शेणखत तयार होतं, जे इतर कुठल्याही प्राण्याच्या शेणखतापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. ज्या गायीचा सहवास, दुध, मल-मूत्र एवढं उपयोगी ठरत असेल, ती गाय श्रेष्ठच नाही का? गायीच्या दुधाव्यतिरिक्त मल-मुत्रही जर इतकं उपयोगी ठरत असेल, तर मग केवळ गाय म्हातारी झाल्यानं दुध देईनाशी झाली म्हणून नकोशी का वाटते?
हीच गाय जेव्हा कसायाच्या दारात कत्तलीसाठी उभी केली जाते, तेव्हा एक नवजात अर्भक दुधाला मुकतं, रक्तदाबाचा एक नवीन रुग्ण तयार होतो, दम्याचा एक नवीन रुग्ण तयार होतो, तर एखाद्या रुग्णाला रोगप्रतिकारक मिळालं नाही म्हणून त्याचा जीव धोक्यात येतो.
अनेक स्वयंसेवी संस्था प्राणीसंवर्धनासाठी काम करतात. वेगवेगळ्या यात्रांमध्ये, धर्मिक स्थळी विविध कार्यक्रमांमध्ये बोकडबळी देण्याला विरोध करतात. बोकडबळी देणे ही ‘अंधश्रद्धा’ आहे असे पटवून-पटवून सांगतात, त्याच स्वयंसेवी संस्था हजारो कत्तलखाण्यांमधून रोज लाखोच्या संख्येने होणारी गायीची कत्तल थांबविण्यासाठी का पुढाकार घेत नाहीत? जर बोकडबळी देणे ही ‘अंधश्रद्धा’ ठरत असेल, तर मग गायीची हत्या करणे ही कुठली श्रद्धा?