जग बदल घालून घाव……

anna
“जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव”,असं म्हणत आपलं उभं आयुष्य दलित बहुजनांच्या उद्धारासाठी वेचणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिक कष्टकर्यांच्या तळहातावर आहे असे सांगणारे अण्णाभाऊ साठे,केवळ दोन दिवस शाळेत जाऊन आपल्या आयुष्याची शाळा करून तत्वज्ञान घडवणारे अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे,रशिया सारख्या देशात ज्यांचा पुतळा आहे असे अण्णाभाऊ साठे,लोकक्रांतीचा धगधगता अंगार म्हणजे अण्णभाऊ साठे.
अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व म्हणजे वेदनेला फोडलेली वाचा होय..!
अतिशय बिकट परिस्थितीत आणि जातीत जन्मलेले अण्णाभाऊ हे पुढे जाऊन जगाच्या इतिहासात विशेषकरून बहुजनाच्या इतिहासात आपलं आढळ स्थान निर्माण करतील असं कदाचित काळालाही वाटलं नसेल.
१९४४ साली अण्णांनी “लाल बावटा ” ह्या पथकाची स्थापना केली.आणि भांडवलदार,जातीयवादी सनातनी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीशी संघर्ष केला.
“माझी मैना गावाकडे राहिली,माझ्या जीवाची होतेया काहिली”या लावणीने अण्णाभाऊ ह्यांना शाहीर म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.त्यांनतर फकिरा,वारणेचा वाघ,स्मशानातील सोन ह्या साहित्य कृतींनी तर साहित्याला नवा आयामच प्रदान केला.पुढे जाऊन अनेक चित्रपट अण्णांच्या साहित्यातून साकार झाले.
एक मजूर,कामगार,रंगारी,तमाशातील सोंगाड्या अशा कितीतरी भूमिका अण्णांनी आपल्या वास्तविक आयुष्यात साकारल्या.
फुला-चंद्रावरच साहित्य निर्माण करणारे खूप झाले मात्र लेखणीला सत्याची चाड शिकवून अस्सल ग्रामीण वास्तववादी लेखन करणारा लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे.त्यांच्या जयंती निमित्त विनम्र “भिमवंदना”