नो वेहिकल डे…..!
| एरवी हे वाक्य आता बऱ्याच जणांच्या अंगवळणी पडलं असेल! दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाच्या दैनिक ‘दिव्य मराठी’ च्या संकल्पनेतून साकारलेला हा एक स्तुत्य उपक्रम! ‘नो वेहिकल डे’ म्हणजे ‘एक दिवस वाहनाविना’. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? आजच्या धकाधकीच्या जीवनांत वाहनाशिवाय एक दिवस काढणे म्हणजे अगदी अशक्यप्राय गोष्ट! कुठे वेळेवर पोहोचायचं असेल, थोडं लांब जायचं असेल, अगदीच महत्वाचं काही काम निघालं तर वाहनाविना हे कसं शक्य आहे? पण हीच अशक्य वाटणारी गोष्ट काही शहरवासीयांनी सहजशक्य करून दाखविली आहे.
‘नो वेहिकल डे’ म्हणजे अगदीच वाहनाशिवाय पायी चालणे नव्हे, तर कामानिमित्त अथवा अन्य कारणास्तव बाहेर जातांना त्या दिवशी स्वतःची स्वयंचलीत दुचाकी अथवा कार असली वाहने बाजूला ठेवून सायकल, ऑटो रिक्षा किंवा बस अशा सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे. असे केल्याने निदान त्यादिवशी तरी वायू आणि ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमी राहील आणि मुख्य म्हणजे इंधनाची बचत देखील होईल. वायूप्रदूषण, इंधनाचा तुटवडा आणि त्यामुळे त्याच्या वाढत्या किमती ह्या सर्व समस्यांवर हा एकमात्र समान पर्याय आहे!
नाशिक जिल्ह्यातील ‘नांदगाव’ ह्या निमशहरी गावात हा उपक्रम पहिल्यांदा राबविला गेला आणि तो यशस्वी देखील झाला. त्या एका दिवसात नांदगाव वासियांनी जवळपास १५०० डॉलरची बचत केली! आता हाच उपक्रम नाशिकमध्ये देखील राबविला जात आहे. नाशिक सारख्या मोठ्या शहरात सगळ्यांनीच एकाच दिवशी हा उपक्रम राबविणे थोडे अवघड झाले असते, म्हणून रोज एकेका क्षेत्रातील लोकांनी ‘नो वेहिकल डे’ पाळण्याचे ठरविले आहे. त्यात व्यापारी, उद्योजक, नोकरदार एवढेच नव्हे तर वकील आणि डॉक्टर देखील सहभागी झालेत!
अशाच प्रकारचा उपक्रम गेल्यावर्षी पुण्यात राबविला गेला. रिक्षावाल्यांची मुजोरी आणि मनमानी कारभाराला कंटाळून आणि इंधन, पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘दैनिक सकाळ’ वृत्तपत्राच्या पुढाकारातून ‘पुणे बस डे’ची संकल्पना पुढे आली आणि यशस्वी देखील झाली होती. त्या दिवशी इतर कुठल्याही वाहनाने प्रवास न करता फक्त पी.एम.टी.बसचाच वापर करण्याचा निर्धार पुणेकरांनी केला. त्याला सर्वच क्षेत्रातून उदंड प्रतिसाद मिळाला.
आता मात्र संकट वाढलं आहे. अमेरिकी डॉलरची वाढती किंमत, त्यामुळे इंधनासाठी मोजावे लागणारे अतिरिक्त पैसे, त्यातच इंधन तुटवडा आणि ह्या सर्वांमुळे दिवसेंदिवस इंधनाच्या वाढत्या किमती, त्यातच वाढत्या प्रदूषणाचे संकट हे सर्व जरा असह्य होत आहे. त्यामुळे असे काहीतरी उपक्रम यशस्वीपणे राबवून ह्या सर्व समस्येवर मात करण्याच्या दिशेने एक पाउल उचलण्यास काय हरकत आहे?