जनतेच्या मनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी…..!
|पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्यात. घोडा-मैदान अजून दूर असूनही संभाव्य पंतप्रधान कोण असेल यावर खमंग चर्चा रोजच ऐकायला मिळते. चर्चेत अनेक नावे असली तरीही भाजपचे नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. त्यानंतर बऱ्याच मागे राहुल गांधींचा नंबर लागतो, मग इतर. मोदींना भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून याआधीच घोषीत केलंय आता इतर पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भूज मधील प्रलयंकारी भूकंप, गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या भीषण जातीय दंगली यांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी गुजरातला सर्वांगीण विकासाच्या वाटेवर नेले. तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात गुजरातने प्रगती केलेली बघायला मिळते. मोदी मोठ्या अभिमानाने ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख करीत असतात. गुजरात दंगलीवरून आजही त्यांच्यावर टीका होत असली तरीही मोदी त्या टीकेकडे दुर्लक्ष करून केवळ विकासाच्या मुद्द्यावरच चर्चा करतात.
मोदी सध्या संपूर्ण देशातील युवकांचे ‘आयडल’ ठरले आहेत. गुजरातमधील वाढते उद्योगक्षेत्र आणि प्रगती यामुळे उद्योगजगतातील धुरंधरही मोदींनाच अनुकुलता दर्शवितात. मोदींनी राज्याकरीता आदर्श उद्योग धोरण अवलंबले. इतर राज्यातून बाहेर पडलेल्या उद्योगांना त्यांनी गुजरातमध्ये जागा मिळवून दिली. उद्योगांना करांत सवलतीही दिल्या. इतर राज्यातील औद्योगिक क्षेत्रात घट होत असतांनाच गुजरातमधील औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होतांना दिसते.
गुजरातच्या कृषी आणि वीजनिर्मिती क्षेत्रातील प्रगतीही उल्लेखनीय आहे. गुजरातमधील जलसिंचनव्यवस्था आणि वीजनिर्मिती क्षेत्रातील सुधारणांमुळे शेतीला मुबलक पाणी मिळते. त्याकरीता मोदींनी राज्यभर कालव्यांचे जाळे निर्माण केले. जिथे इतर राज्यातील शेतकरी दुष्काळ, कर्जबाजारीमुळे आत्महत्येस प्रवृत्त होतात, तिथे गुजरातमधील कृषीक्षेत्रातील प्रगती नक्कीच कौतुकास पात्र ठरते.
गुजरातमधील विकास मीडियाद्वारे जगासमोर येत असतांना गुजरातला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार हे स्वाभाविकच. त्यामुळे राज्यातील विविध पर्यटनस्थळी अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम मोदींनी केले. पर्यटनक्षेत्राचा विकास त्यांनी जाहिरातींद्वारे जगासमोर मांडला आणि लोकांना गुजरातमध्ये येण्याचे आवाहनही केले.
थोडक्यात नरेंद्र मोदींनी गुजरातच्या सर्वांगीण विकासाच्या पाहिलेल्या स्वप्नाच्या वाटेवर त्यांनी गुजरातला अग्रेसर ठेवले. सोशल नेटवर्किंग वेबसाईट पासून प्रेस-इलेक्ट्रॉनिक माध्यम सगळीकडे मोदींविषयीच सर्वाधिक चर्चा ऐकायला मिळते. सोशल नेटवर्किंग वेबसाईटवरील त्यांच्या पेजला अमाप प्रतिसाद मिळतो. ते स्वतः सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर २४ तास उपलब्ध असतात. त्यांची कार्यक्षमता वादातीत आहे.
गुजरातमधील विकासाचे लोन संपूर्ण देशात पसरावे याकरिता नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे काळाची गरज आहे. जनतेच्या मनातला पंतप्रधान म्हणून मोदींचा लौकिक असला तरी येत्या निवडणुकात बहुमतासह त्यांना पंतप्रधानपदी आरूढ होतांना पाहण्यासाठी बहुसंख्य जनता आसुसलेली आहे. देव त्यांची इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना!
NARENDRA MODI….PM OF INDIA
yahi hoga
neeed of country- Narendra Modi
deshala garj aahe modijinchi