जागतिक एड्स दिन….

     indexउद्या १ डिसेंबर. हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो! ‘एड्स’ हा शब्द उच्चारायला आणि लिहायला अतिशय सोपा, मात्र हा रोग सोपा नाही. कुणाला ह्या रोगाची लागण झाली असे साधे माहिती जरी पडले तरीही अंगावर काटे उभे राहतात. पूर्वी कर्करोग हा सर्वांत भयानक रोग मानला जाई, मात्र ‘एड्स’ ह्या रोगाचा शोध लागल्यानंतर त्यालाच सर्वांत भयंकर रोग मानले जाऊ लागले. कर्करोगावर आता इलाज निघालेत. चांगले उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कर्करोग बराही होऊ शकतो. मात्र, १९८१ साली एड्सच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाल्यानंतर आजतागायत ह्या रोगावर इलाज, औषध, लस किंवा हा रोग पळवून लावणारी उपचारपद्धती यांचा शोध लागला नाही. काही लोक तसा दावा जरी करत असले तरी त्यामागील सत्यता अजूनही बाहेर आलेली नाही.

    हा रोग मुख्यतः चार कारणांमुळे होतो. १) HIV बाधित रूग्णाला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई वापरल्याने २) HIV बाधित व्यक्तीचे रक्त दुसऱ्या रुग्णाला दिल्याने ३) HIV बाधित गरोदर महिलेपासून तिच्या होणाऱ्या बाळाला आणि ४) असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे.

    यातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या कारणांमुळे एड्स होण्याचे प्रमाण आता नगण्यच उरले आहे. कारण जवळ-जवळ सर्वच दवाखाने आणि रक्त संकलन करणारी केंद्रे आपले कर्तव्य चोख निभावतांना दिसतात. प्रत्येक रुग्णाला इंजेक्शन देतांना सुई एकतर बदलली जाते किंवा ती गरम पाण्यात उकळवून निर्जंतुक केली जाते. आणि रक्त संकलन करणारी केंद्रे संकलित केलेल्या रक्ताच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या खेरीज रुग्णाला रक्त देत नाही. तसेच गरोदर महिलेची HIV तपासणी करून योग्य खबरदारी घेतल्याने तिच्या बाळाला होणारी लागण टाळता येऊ शकते. त्यामुळे एड्स होण्याचे प्रमाण चौथ्या कारणामुळेच अधिक आहे.

      ठराविक वयानंतर लैंगिक भावना उत्पन्न होणे काही गैर नाही. मात्र, त्या शमविण्यासाठी असुरक्षित संबंध ठेवणे जीवाला धोकादायक ठरू शकते. अशा संबांधावेळी काही रोगफैलाव रोखणाऱ्या साधनांचा वापर करून एड्सचा फैलाव रोखला जाऊ शकतो, मात्र त्याचीही शंभर टक्के हमी देता येत नाही. म्हणून अशा संबंधांपासून दूर राहणेच हितावह ठरते.

      मात्र, ह्या चार कारणांव्यतिरिक्त इतर कारणाने एड्स होतो असे मानणे पूर्णतः चुकीचे आहे. हा रोग संसर्गजन्य नाही. म्हणून एड्सबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्यासोबत हस्तांदोलन केल्याने, सोबत जेवण केल्याने हा रोग होत नाही. म्हणून एड्स बाधित रुग्णांना वाळीत टाकू नये. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे काही दिवस उरलेले असतांना त्यांना वाळीत टाकून आपण त्यांचे ह्या आजाराला तोंड देण्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरणच करतो. याव्यतिरिक्त आपण त्यांच्याशी सौदार्हाचे, स्नेहाचे संबंध ठेवले तर त्यांचे अखेरचे दिवस सुखात निघून जातील. काही शाळांमधून एड्स बाधित विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मज्जाव केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, अशा घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असून पूर्णतः चुकीच्या आहेत.

       एड्स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र असे म्हणून गाफील राहून चालणार नाही. म्हणूनच वरील माहिती कित्येकांना ठाऊक जरी असली तरीही तुमच्यासमोर प्रस्तुत करणे महत्वाचे वाटले!

सतर्क रहा ! सुरक्षित रहा !