जागतिक क्रिकेटमधील सुवर्णयुगाचा अस्त…..
| तब्बल २४ वर्षे क्रिकेटची सेवा केल्यानंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर निवृत्त होत आहे. एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्त झाल्याने सचिनच्या क्रिकेट कारगीर्दीचीच सांगता होणार आहे.
समोर कुठलाही गोलंदाज असला तरीही त्याची गोलंदाजी यथेच्छ फोडायची असा सचिनचा वकूब! म्हणूनच त्याला ‘मास्टर ब्लास्टर’ असेही नाव पडले. सचिन मराठी असल्याने मराठी मनाचा मानबिंदू म्हणूनही ओळखला जातो. महाराष्ट्राच्या घरातील आबालवृद्ध सचिनला लाडाने ‘तेंडल्या’ असेही म्हणतात. क्रिकेट खेळता-खेळता अनेक विक्रम सचिनने आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळेच त्याला ‘विक्रमादित्य’हि म्हटले जाते. त्याने अनेक विक्रम मोडीत काढले तर काही विक्रमांना गवसणी घालणारा तोच पहिला क्रिकेटपटू ठरला. एकदिवसीय सामन्यात व्यक्तिगत २०० धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मिळून शतकांचे शतक साजरा करणारा तो जगातला एकमेव फलंदाज. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत, तर सर्वाधिक शतकेही त्याच्याच नावावर! सर्वाधिक ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ‘सामनावीर’ पुरस्कार मिळविण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर. हे आणि असे तब्बल ९४ विक्रम सचिन तेंडूलकरच्या नवे आहेत.
सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारगीर्द म्हणजे जागतिक क्रिकेटचे सुवर्णयुग म्हटले तरीही वावगे ठरू नये! सचिन जसा मायदेशात लोकप्रिय आहे, तितकाच लोकप्रिय संपूर्ण क्रिकेट जगतात आहे. त्याच्या संघ सहकाऱ्यांइतकेच इतर देशांचे क्रिकेटपटूही त्याचा आदर करतात. केवळ सचिन खेळणार म्हणून देश-विदेशात अनेक क्रिकेटप्रेमी सामन्याला आवर्जून उपस्थिती लावतात. कारगीर्दीतील सचिनचा खेळ जसा बहरू लागला तसतशी त्याची लोकप्रियता वाढू लागली. त्यामुळे क्रिकेट बघणाऱ्या आणि खेळणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. त्यामुळे सचिनला ‘जागतिक क्रिकेटचा राजदूत’ असेही म्हटले .
आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने सचिन सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. विश्वविख्यात फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हे देखील त्याच्या फलंदाजीने प्रभावित झाले. सचिनची फलंदाजीची शैली आणि ब्रॅडमन यांच्या शैलीत साम्य असल्याचेही त्यांनी स्वतः सांगितले होते. सचिन जेव्हा फलंदाजी करायचा तेव्हा इतर खेळाडूही प्रेक्षकाची भूमिका पार पाडत, असे सन्मानाने म्हटले जाई. क्रिकेट हा जर धर्म समजला तर सचिन हा त्या धर्माचा देव आहे असेही मानले जाते. एका समालोचकाने सामन्याचे समालोचन करतांना म्हटले होते, ‘ज्यावेळी सचिन फलंदाजी करीत असतो, ती वेळ पाप करण्यासाठी सर्वात चांगली वेळ असते. कारण त्यावेळी स्वर्गातील देवी-देवताही त्याची फलंदाजी बघण्यात मग्न असतात.’
सचिनने आपल्या चाहत्यांना एका मुलखाती दरम्यान संदेश देतांना म्हटले होते, ‘जेमतेम साडेपाच फुट उंचीच्या, कुरळ्या केसांच्या, बारीक आवाजाच्या, बसक्या नाकाच्या नाकाच्या व्यक्तीला कोण आपल्या कंपनीचा ‘ब्रान्ड अम्बेसिडर’ बनवणे पसंत करेल? मात्र, माझ्यापुढे मला ‘ब्रान्ड अम्बेसिडर’ बनवून घेण्यासाठी रंग लागतात. हे यश मी माझ्या मेहनतीच्या, कर्तुत्वाच्या जोरावर मिळविले आहे. तुम्हीही तुमच्या आयुष्यात असेच कर्तृत्ववान बना!’ खरोखर सचिनचा हा संदेश फारच मोलाचा वाटतो.
‘सचिन शिवाय क्रिकेट आणि क्रिकेट शिवाय सचिन’ याची कल्पनाही कुणी करू शकत नाही, मात्र हे सत्य आता पचवावे लागेल. सचिनने १४ नोव्हेंबर १९८९ पासून उपसलेलं ‘धावास्त्र’ येत्या १५ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडीज विरुद्ध्याच्या दुसऱ्या कसोटीनंतर म्यान करीत आहे. हा त्याचा २००वा कसोटी सामना असेल. ‘आता क्रिकेट कुणासाठी पहायचे?’ अशी भावना मनात येत असली तरीही सचिनने ज्या उंचीवर भारतीय क्रिकेटला नेले आहे ते अबाधित ठेवण्यासाठी भारतीय संघाचे पाठीराखे म्हणून आपल्याला उभे रहावेच लागेल आणि त्यातही सचिनच सर्वप्रथम असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही!
सचिन, तू आणि तुझा खेळ ह्या दोघांनाही सलाम!