डिओ-परफ्युम निवडताना.

Perfumeव्यक्तिमत्त्वात आकर्षकता आणण्यासाठी नानाविध उपाय योजले जातात. उत्तम पेहराव, आकर्षक देहबोली, स्टायलिश अँक्सेसरीजचा वापर हा त्याचाच एक भाग आहे. पण हे सर्व असले तरी सुगंधाची कमतरता खुपत राहतेच.

म्हणूनच परफ्युम, डिओ, अत्तर आदींचा वापर वाढतो आहे. सुगंधाचा दरवळ माणसाला प्रसन्न करतो. एखादा सुगंधी फवारा सगळे वातावरणच बदलवू शकतो. म्हणूनच आज डिओ मारल्याशिवाय बाहेर पडणारी तरुणाई अभावानेच पहायला मिळेल.

प्रत्येकाचा ब्रँड ठरलेला, प्रत्येकाचा फ्रेगरन्स ठरलेला. डिओप्रमाणेच परफ्युमचे वेगळे विश्‍व आहे. परफ्युमइतक्याच त्याच्या आकर्षक बाटल्यांचीही चर्चा असते. पण या सगळय़ात अत्तराचे स्थान आहे ते आहेच. विशेषत: खास सणांसाठी तर अत्तर हवेच. भारतातील अस्सल गुलाब, हीना, वाळा यासारखी लोकप्रिय अत्तरे सोडली तर बहुतेक सुगंध कृत्रिम सुगंधाच्या वर्गात मोडतील. दर्जेदार अत्तर बनवण्यासाठी सुगंधी पुष्पातून बाष्प रूपातून सुगंधी घटक मिळवून चंदनाच्या तेलावर शोषून घेण्याची क्रिया केली जाते. म्हणूनच दर्जेदार अत्तराची किंमत सोन्याची बरोबरीत असू शकते.

बकुळ, हीना, गुलाब, मोगरा, चाफा, निशिगंध, केवडा, पारिजातक, वाळा असे सुगंध वर्षानुवर्षे भारतीय मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

अत्तरासाठी काचेची कुपी वापरणे चांगले. अत्तर काढल्यावर कुपीचे झाकण त्वरित बंद करावे. अत्तरामध्ये कुठलाही अन्य द्रव मिसळू नये तसेच ही कुपी प्रखर उजेडात अथवा प्रकाशात ठेवू नये. हाताच्या उडणार्‍या नसेवर अत्तर लावावे. यामुळे उष्णता मिळून सुगंध दरवळायला मदत होते. सुगंध देणार्‍या डिओ, टाल्क, परफ्युम हे पर्यायही शरीराला सुगंधित करणारे आहेत. लवकरच कडक उन्हाळा सुरू होईल. या दिवसात सुती कपडे वापरण्याबरोबरच थंड गुणधर्म असणार्‍या अत्तराचा वापर सुखद ठरतो.