तणावमुक्तीसाठी…

tension-1सध्या सार्‍यांचेच जीवन तणावग्रस्त बनले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत करावी लागणारी धावपळ आणि सोबतीला अनेक प्रकारचे ताण-तणाव अशी परिस्थिती दिसते. त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशा परिस्थितीत शरीर आणि मनावरचा ताण कमी होण्याची आवश्यकता असते. मालिशमुळे हा ताण कमी होणे शक्य होते. रोजच्या धकाधकीत अंग तुटून गेल्यासारखं वाटतं, कोणीतरी हात-पाय, कंबर, डोकं छान रगडून दिलं तर किती मस्त, असं वाटू लागतं. ही इच्छा स्पामध्ये पूर्ण होऊ शकते. ‘डी-स्ट्रेस ट्रीटमेंट’मुळे ताण कमी होतो. स्पामध्येच मालिश करणं योग्य आहे, कारण तिथलं वातावरण जाणूनबुजून निर्माण केलेलं असतं. स्पाच्या प्रवेशद्वारात छानशी तरंगती फुलं असतात, डोळ्यांना थंडावा देणारी सुखद रंगसंगती आणि इंटिरियर डेकोरेशन असतं. छान टापटिप असते, मंद संगीत, तेलांचे मंद सुवास आणि अत्यंत सौहार्दानं वागवणारा कर्मचारी वर्ग या सगळ्याचं मिळून एक वातावरण असतं. प्रत्यक्ष मसाजला सुरुवात होण्यापूर्वी या सगळ्याचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि मसाजमुळे याचा कळस साधला जातो. मसाजदरम्यान मोबाईल बंद असतात आणि मनाचे कप्पे हळूवार बंद होत जाऊन नकोसे, तापदायक विचार हळूवार बाहेर निघून जातात. हा भावनिक निचरा होणं म्हणजेच डी स्ट्रेस होणं. एखादे वेळी तरी हा अनुभव घेऊन पाहायला हरकत नाही.