तयारी ग्रुप डिस्कशनची

group-Discussionअलीकडे खाजगी क्षेत्राबरोबर सरकारी क्षेत्रातही नोकरीच्या व्यापक संधी उपलब्ध होत आहेत. ठरावीक तास आणि र्मयादित काम आणि प्रॉव्हिडंट फंड, नवृत्तीवेतन यासारख्या सुविधांमुळे सरकारी क्षेत्रातील नोकरीकडे ओढा वाढत आहे. सरकारी नोकरी मिळवताना लेखी परीक्षेत यश मिळवणे फारसे कठीण जात नाही. कारण शिक्षण सुरू असताना स्पर्धात्मक परीक्षेची कसून तयारी केली जाते. शिवाय वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देण्यामुळे त्या संदर्भातील अनुभवही येतो. परंतु गाडी अडते ती ग्रुप डिस्कशनच्या प्लॅटफॉर्मवर. हल्ली सरकारी नोकरीतही ग्रुप डिस्कशनला महत्त्व प्राप्त झालं आहे. ही दिसायला सोपी बाब वाटत असली तरी प्रत्यक्षात कठीण ठरते. हे लक्षात घेऊन आजकाल अनेक खाजगी संस्थांमधून ग्रुप डिस्कशनबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये असणार्‍या इतरांच्या क्षमतेएवढी क्षमता आणि आत्मविश्‍वास आपल्यात आहे याची जाणीव हवी. त्यामुळे समूह चर्चेत आत्मविश्‍वासाने सहभागी व्हावे. समूह चर्चेत प्रत्येक जण आपल्या मुद्दय़ावर भर देत असतो. अशा वेळी तुम्ही मांडलेला मुद्दा योग्य आणि महत्त्वाचा कसा आहे हे पटवून देता यायला हवं. त्या वेळी विविध विषयांचं सामान्य ज्ञान उपयोगी पडतं. ग्रुप डिस्कशनची सुरुवात आवडत्या आणि बर्‍यापैकी माहिती असलेल्या विषयाने करावी. त्याला ताज्या घटनांचे संदर्भ जोडणं हिताचं ठरतं. त्यामुळे तुम्ही मांडलेला मुद्दा अधिक प्रभावी आणि सर्वमान्य ठरतो. ग्रुप डिस्कशन ही नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेतील शेवटची पायरी असते. साहजिक या फेरीमध्ये आलेलं अपयश ताण वाढवू शकतं. इतरांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेणं, त्यांचं मुद्दे तर्कशास्त्र आणि पुराव्यांच्या आधारे खोडून काढणं त्याचबरोबर इतरांच्या मान्य करण्याजोग्या मुद्दय़ांबाबत खिलाडूवृत्ती दाखवणं या बाबीही गरजेच्या ठरतात. या सार्‍या बाबी लक्षात घेऊन समूह चर्चेत सहभागी झाल्यास कठीण काहीच नाही.