तरुण तेजपालांचे कृत्य समाजाठी मारक….
|‘तहलका डॉट.कॉम’ चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल सध्या भलतेच गाजतायेत! स्टिंग ऑपरेशन द्वारे वाजपेयी सरकारमधील संरक्षण खात्यातील दलाली चव्हाट्यावर आणणारे तेजपाल सहकारी पत्रकार महिलेवर केलेल्या अत्याचाराने चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
भारतात महिलांवर होणारे अत्याचार म्हणजे काही असामान्य बाब राहिली असे वाटत नाही. कारण, पाकीटमारीचे गुन्हे घडावेत तसे महिलांवर अत्याचार घडत आहेत. ह्या घटनांमध्ये कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जातायेत. नुसती संख्याच वाढते आहे असेही नाही, त्याची तीव्रता, विकृती आणि दाहकताहि वाढू लागली आहे. एकट्यादुकट्या मुली व महिलेला एकटे फिरणे आता असुरक्षित वाटायला लागले आहे. सततच्या होणाऱ्या ह्या घटनांविषयी समाजात द्वेषही वाढत आहे. गेल्या काही घटना घडल्यानंतर त्याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आणि गुन्हेगारांना कडक शिक्षेची मागणी करणाऱ्या जनतेने ते दाखवूनहि दिले आहे.
त्यातच ‘तहलका’ सारख्या ‘कथित’ सत्य बाहेर आणून खळबळ उडवून देण्याचा दावा करणाऱ्या वृत्तसंस्थेच्या संस्थापक संपादकाने सहकारी पत्रकार महिलेवरच अत्याचार करावा हे निश्चितच संतापजनक आहे. वृत्तसंस्था लोकशाहीच्या आधारस्थंभ मानल्या जातात. जनतेचे सतत वृत्तासंस्थांवर, त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आणि माहितीवर बारीक लक्ष असते. त्यामुळे ह्या संस्थांकरिता काम करणाऱ्यांची जबाबदारी नुसती त्या संस्थेपुरताच नाही तर समाजासाठीही वाढते. हीच संवेदना ध्यानात ठेऊन त्यांनी आपले काम करायला हवे. ज्यांनी आपल्या कामाने आदर्श निर्माण करायला हवा त्यांनीच असे कुकृत्य करावे हे समाजाच्या दृष्टीने नक्कीच हितावह नाही!