१६० वर्षांची परंपरा लाभलेली ‘तार’सेवा होणार इतिहासजमा

तार सेवा म्हणजेच टेलिग्राफ सेवा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगम लिमिटेडने जाहीर केला आहे.letterआज दालन-वळणाची अनेक प्रभावी साधने उपलब्ध आहेत. “स्मार्ट फोन’, “ई-मेल’, सोशल मीडिया, “एसएमएस’ अशी संपर्काच्या माध्यमांचा वापर वाढल्याने तारसेवा मागे पडली. म्हणूनच १६० वर्षांचा इतिहास असलेली “टेलिग्राफ’ सेवा (तार) येत्या १५ जुलैपासून इतिहासजमा करण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला.

तार सेवेची सुरुवात १८५० मध्ये झाली. आनंदाची आणि दुःखाची बातमी लवकर मिळावी, यासाठी देशात तार सेवेचाच वापर केला जात असे. साध्या टपालाऐवजी तार आली की भीती आणि कुतूहल वाटायचे. नक्कीच महत्त्वाची बातमी असणार, हे नक्की असायचे. मात्र, संपर्काची नवी माध्यमे जसजशी विकसित होत गेली, तार सेवेचा वापर कमी होत गेला. व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने अखेर “बीएसएनएल’ने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्लीतील “बीएसएनएल’च्या कॉर्पोरेट ऑफिसमधून टेलिग्राफ सेवेचे वरिष्ठ सरव्यवस्थापक शमीम अख्तर यांनी ही सेवा बंद करण्यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले.  दूरसंचार विभागाच्या जिल्हा आणि मंडळ कार्यालयांना पाठविण्यात आलेल्या या परिपत्रकात १५ जुलैपासून तारेची नोंदणी घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

व्यावसायिकदृष्ट्या परवडत नसलेल्या तार सेवेला मदत देण्याची मागणी “बीएसएनएल’ने केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, सरकारने कंपनीच्या संचालक मंडळाने यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे सांगितले. त्यानंतर टपाल विभागाशी चर्चा करून ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे दिल्लीतील “बीएसएनएल’च्या सूत्रांनी सांगितले. सध्या तार सेवेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची मोबाईल, लॅंडलाइन, ब्रॉडबॅंड यांसारख्या सेवांचे काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत या बदल्या होण्याची शक्‍यता आहे.

तार सेवेचा वापर
ग्रामीण भागात काही प्रमाणात तारेचा वापर केला जात असे. लष्कर, तसेच सुरक्षा दलातील जवानांकडून रजेची मागणी, बदली तसेच कामावर रुजू झाल्याचे “रिपोर्टिंग’ करण्यासाठी तारेचा वापर केला जातो. देशातील न्यायालयांमध्ये दिवाणी आणि गुन्हेगारी खटल्यांमध्ये तार आणि तारेची पावती अजूनही पुरावा म्हणून ग्राह्य मानली जाते. सरकारने मे 2011 मध्ये साठ वर्षांच्या खंडानंतर तार सेवेच्या दरात वाढ केली होती.

इतिहास 160 वर्षांचा
ब्रिटिशांनी 1850 मध्ये कोलकता ते डायमंड हार्बर दरम्यान पहिली इलेक्‍ट्रिक टेलिग्राफ लाइन टाकली. 1851 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून या सेवेचा वापर सुरू झाला. त्याच वेळी कोलकता ते पेशावर, आग्रा, मुंबई, चेन्नई, बंगळूर या शहरांना जोडणारे सुमारे 4 हजार मैल लांबीचे टेलिग्राफ लाइनचे जाळे उभारण्यास 1853 मध्ये सुरवात झाली. 1854 मध्ये या सेवेसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला.