थायलंड – Thailand

थायलंडचे म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.

इतिहास
वर्तमान थायलंडाच्या भूप्रदेशावर सुमारे ४०,००० वर्षांपासून मानवाचे वास्तव्य असल्याचे पुरावे आहेत.
या प्रदेशातील संस्कृतीवर प्राचीन काळापासून – म्हणजे इ.स.च्या १ल्या शतकातील फूनान राज्यापासून – भारतीय उपखंडातील संस्कृतीचा प्रभाव आहे.

फूनान राज्यानंतर येथे ख्मेर साम्राज्याची सत्ता इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत चालली. ख्मेरांचे साम्राज्य लयास गेल्यावर काही काळ ताय, मोन, ख्मेर, मलय समूहांची छोटी छोटी राज्ये उभी राहिली. इ.स. १२३८ साली आजच्या थायलंडाच्या उत्तर भागात सुखोथाई साम्राज्य उदयास आले.


ही सयाममधील पहिली बौद्ध सत्ता मानली जाते. मात्र अवघ्या एका शतकानंतर (इ.स.च्या १४व्या शतकाच्या मध्यावर) दक्षिणेकडील चाओ फ्रया नदीच्या तीरावर उदयास आलेल्या अयुध्या साम्राज्याने सुखोथाई व परिसरातील अन्य सत्तांना झाकोळून टाकले.


या साम्राज्याच्या काळात अयुध्या नगराचा व्यापार अरबी द्वीपकल्प, पर्शिया, भारत, चीन इत्यादी आशियाई व्यापारी केंद्रांशी, तसेच डच, पोर्तुगीज, ब्रिटिश इत्यादी युरोपीय व्यापाऱ्यांसहदेखील चाले. इ.स. १७६७ सालच्या आक्रमणादरम्यान बर्मी सैन्याने अयुध्या लुटली, उद्ध्वस्त केली.


तेव्हा राजा तक्षिणाने अजून दक्षिणेस जाऊन चाओ फ्रया नदीच्या तीरावरच्या धोनपुरी या ठाण्यास आपली राजधानी हलवली व तेथून १५ वर्षे राज्य चालवले. इ.स. १७८२मध्ये बुद्ध योद्फा चुलालोक या सेनाधिकाऱ्याने तक्षिणाची राजवट उलथून चक्री घराण्याची सत्ता स्थापली व राजधानी म्हणून बांकोकास निवडले. चक्री घराण्याच्या राजवटीपासूनच्या या काळास रतनकोशिन कालखंड असे अभिधान असून, थायलंडाच्या आधुनिक पर्वाचा तो आरंभ मानला जातो.

इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात आशिया व आफ्रिका खंडातील अन्य भूप्रदेशांत वसाहतवादाचा शिरकाव होत असताना
मात्र थायलंड कधीच कोण्याही युरोपीय वसाहतवादी सत्तेपुढे नमला नाही. आग्नेय आशियातील वर्चस्वस्पर्धेत फ्रेंच व ब्रिटिश अश्या दोन्ही वसाहतवादी सत्तांशी चातुर्याने राजनैतिक व्यवहार जपत थायलंडाने आपले सार्वभौमत्व अबाधित राखले.

इ.स.च्या विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धात थायलंडाने जपानास सहकार्य केले. मात्र महायुद्धोतर कालखंडात बह्वंशी काळ थायलंड अमेरिकेच्या मित्रपक्षात राहिला आहे.

राष्ट्रीय ग्रंथ
रामायण हा थायलंडचा राष्ट्रीय ग्रंंथ आहे असे मानले जाते. सयामच्या राष्ट्रीय जीवनात रामायण-उत्सवांना विशेष स्थान आहे.

रामायणातील कथाप्रसंग हे थायलंडमधील नाट्य आणि लोकनाट्याचे विशेष विषय आहेत. वाल्मिकीकृत रामायणापेक्षा थाई रामायणाचे कथानक काहीसे वेगळे आहे.