दहीहंडी
|
या वर्षी दहीहंडी उत्सवात बालगोविंदांवरील बंदीमुळे मागील वर्षीइतके थर लावणे काही महिला गोविंदा पथकांना कठीण झाले आहे. त्यामुळे थरांच्या थरारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही मंडळांनी मात्र “कारवाई झाली तरी बेहत्तर; सुरक्षिततेची खबरदारी घेऊन बालगोविंदांना सहभागी करणारच‘, असा पवित्रा घेतला आहे.
कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न गोविंदा पथके सतत करतात; मात्र उच्च न्यायालयाने बालगोविंदांवर बंदी आणि थरांवर मर्यादा घालण्याचे आदेश दिल्यामुळे यंदा थरांचा थरार संकटात सापडला आहे. वरील थरासाठी “एक्का‘ म्हणून वयाने आणि शरीरयष्टीनेही लहान असलेल्या मुलाची अथवा मुलीची निवड केली जाते. त्यावर या वर्षी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विलेपार्ले येथील पार्ले स्पोर्टस् क्लबने मागील वर्षी सात थर लावले होते; यंदा बालगोविंदांवरील बंदीमुळे हे मंडळ सहाच थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. बारा वर्षांवरील मुलीचे वजन बहुधा 30 किलोपेक्षा जास्त असते; त्यामुळे तेवढे वजन पेलू शकेल, अशा मुली कुठून आणायच्या? त्यामुळे यंदा दोन “एक्के‘ न लावता एकच “एक्का‘ लावणार आहोत.