दुर्गभ्रमंती- किल्ले “तोरणा”

तोरणा –torana

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला स्वराज्याचा हा पहिला किल्ला तोरण गडावर श्री तोरणाजाई मंदिर, बिनी दरवाजा, गंगाजाई मंदिर, झुंजारमाची टकमक बुरुज, बालेकिल्ला, कोकण दरवाजा, हनुमान बुरुज, वेताळ इ. महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत.

बालेकिल्ल्यावरून पूर्वेस पाहिले की, सिंहगड, पुरंदर, खडकवासला धरण, रायरेश्वर इ. भाग दिसतो, तर पश्चिमेकडील बाजूस, प्रतापगड, मकरंद गड व लांबवरचा रायगडही दिसतो. या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे १४०४ मी. आहे. गडावर जाण्याकरिता अतिशय अरुंद, अवघड अशी वाट आहे, आजही सरळ-सोपी, पायर्‍या-पायर्‍यांची वाट नाही. काही लोखंडी गज मार्गावर रोवलेले आहेत. त्या गजांचा आधार घेत गड चढावा लागतो. ह्या गडाची चढण गिर्यारोहणाचा आनंद देते. गडाच्या आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो. एका इंग्रज अभ्यासकाने, ‘‘सिंहगड ही सिंहाची गुहा अन् तोरणा हे गरूड पक्षाचे घरटे आहे’’, असे उद्गार या गडाबद्दल काढले आहेत. या किल्ल्यावर बांधकाम करत असताना छत्रपतींना प्रचंड धन सापडले, ज्याचा उपयोग पुढे स्वराज्यासाठी झाला.