धोका सारकॉइडोसिसचा

Sarcoidosisसारकॉइडोसिस या आजाराची लक्षणं टी.बी. सारखीच आहेत. बरेचदा तज्ज्ञही लक्षणांवरून रुग्णाला टी.बी. असल्याचंच निदान करतात आणि त्याप्रमाणेच औषधोपचार करतात. कोरडा खोकला, सतत बारीक ताप, हातापायांमध्ये तीव्र वेदना आणि अधूनमधून धाप लागणे ही सारकॉइडोसिसची लक्षणं आहेत. यामध्ये रुग्णाला सतत खोकला येतो. आजाराच्या पुढच्या अवस्थेत शरीरातील अन्य अवयव प्रभावित होऊ लागतात. उदा. डोळे प्रभावित होऊन दृष्टी कमी होते. त्वचेवर लालसर डाग उमटतात. यकृताचा आकार मोठा होतो. गंभीर अवस्थेत रुग्णाच्या मेंदूवर थेट परिणाम होतो. शरीरावर सूज वाढते आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ही सर्वात गंभीर आणि अंतिम अवस्था आहे. या अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णावर उपचार नाहीत. म्हणूनच प्राथमिक अवस्थेतच या आजारावर उपचार व्हायला हवेत. बरेचदा निदान नीट न झाल्यास स्टेरॉईडचा मारा केला जातो. मात्र, हे देखील धोकादायक आहे.