नारळी पौर्णिमा .

narayi pornimaकोळीवारा सारा सजलाय गो..! कोळी यो नाखवा आयलाय गो !…

कोळ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. कोळीवाड्यांमध्ये आज हा सण धुमधडाक्‍यात साजरा होणार आहे. कोळ्यांनी समुद्रात होड्या सोडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. होड्या रंगरंगोटी करून सजवण्यात आल्या आहेत. दर्या सागराला आपला मान देण्यासाठी कोळी महिला नैवेद्याच्या तयारीला लागल्या आहेत. सोन्याचा नारळ अर्पण करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून त्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
मुंबई , ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे,वेसावा, माहीम, मढ, सातपाटी, ओवला, चारकोप, मालवणी, वाशी-सारसोळे, बेलापूरमधील दिवाळे कोळीवाड्यात मंगळवारी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग पाहायला मिळत होती. कोळी महिलांसह बच्चेकंपनी घराघरात सजावट करताना दिसत होती. तर कोळ्यांनी किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी केली आहे. तसेच काही ठिकाणी होड्या सजावटीचे कामही सुरू होते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करण्यात गुंतल्या होत्या. एकूणच कोळीवाड्यातील उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. बुधवारी नारळाची विधिवत पूजा करून तो समुद्राला अर्पण केला जाणार आहे. ढोलताशांच्या गजरात मिरवणुकाही काढण्यात येणार आहेत. सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमणार आहेत. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. “मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे’ अशी मागणी केली जाणार आहे. असा धुमधडाक्यात साजरा होणारा आज नारळी नारळी पुनवचा सन आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपण साजरी केलेली नारळी पौर्णिमेची धम्माल आम्हला जरूर कळवा. ” सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा ” !!