नाशिक पर्यटन

Ghats_in_Nashikतिर्थाटनासाठी लाखो भाविकांचं अनोखं श्रद्धास्थान असलेले नाशिक शहर देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक हे जगाचे केंद्रबिंदू झालेले असते. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले नाशिक शहर हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणूनच प्रसिद्ध आहे, यात शंका नाही. नाशिकमध्ये येणारे ९0 टक्के पर्यटक धार्मिक कारणाने येत असतात. एका तपानं भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यानं नाशिकच्या धार्मिक आणि अध्यात्मिक वैभवाला एक दर्जा प्राप्त करून दिला आहे. देशी आणि परदेशीयांची मांदियाळी या नाशिकच्या रामकुंडावर पहावयास मिळते. नाशिक हे टुरिझम डेस्टिनेशन म्हणून पुढे आले आहे.

pandavleni-cavesनाशिकमध्ये असलेल्या विशेष कला, स्थापत्य, संगीत, खाद्यपदार्थ, चालीरीती आदींशी येणारे पर्यटक समरस होत असतात. पांडव लेणी, चामरलेणी यासारख्या कोरीव लेण्या, त्र्यंबकेश्‍वर, गोंदेश्‍वर या मंदिरांचे स्थापत्य व त्यावरील शिल्पे पाहून तोंडात बोटे घातली जातात. रामशेज, साल्हेर-मुल्हेर, अनकाई या सारखे पुरातन किल्ले आणि त्यांचा इतिहास त्यांच्या वैभवाची साक्ष देतात. या सर्व वास्तूतून नाशिकच्या संस्कृती, परंपरा आणि वारसा यांची ओळख होते.

नाशिकपासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठ तालुक्यातील रामशेज किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. tryambakeshvar घाटाचा परिसर लाभलेल्या या किल्ल्याच्या आत काही लेण्याही आहेत. किल्ल्याचा परिसर अत्यंत रमणीय आहे. नाशिकपासूनच २७ कि.मी. अंतरावर त्र्यंबकेश्‍वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. त्र्यंबकेश्‍वराचे मंदिर हे स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. दर १२ वर्षांनी होणार्‍या कुंभंमेळ्यात लाखो भाविक त्र्यंबकेश्‍वरला भेट देत असतात. गोदावरीचा उगमही त्र्यंबकेश्‍वरलगत असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाचा परिसरही अत्यंत रमणीय आहे. जवळच असलेला अंजनेरीचा परिसर, दुगारवाडीचा धबधबा, परिसरातील वनराई, ब्रह्मगिरी पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेला असा सारा परिसर आहे. हिवाळ्यातील परदेशी पक्ष्यांचे आगमन आणि त्यांचा धरण ठिकाणावर असलेला वावर ही सुद्धा विशेष आकर्षणाची बाब आहे. सिन्नर तालुक्यातील गोंदेश्‍वर मंदिराचे बांधकाम १२ व्या शतकातील असून, मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी स्वरूपाचे आहे.

71102216आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ असलेले सप्तशृंगगड, त्र्यंबकेश्‍वरमधील नवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, ब्रह्मगिरी फेरी मार्ग, इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी, कावनई तीर्थक्षेत्र, महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ख्यात असलेलं नांदुरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य, नाशिक शहरालगत असलेले श्री सर्वतीर्थ टाकेद, सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील गोदावरी नदीकाठचा परिसर, भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक, दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड परिसर, नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील बालाजी मंदिर आणि परिसर, पेठ तालुक्यातील श्री क्षेत्र दावलेश्‍वर, बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी पर्वतावरील श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र, येवला तालुक्यातील कोटमगाव मंदिर, नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनि मंदिर या आणि अशा कितीतरी ठिकाणांचे वेगळेपण पर्यटकांच्या भेटीने अधिकाधिक प्रख्यात होण्यास मदत होते आहे. राज्याच्या विविध भागातूनच नव्हे, तर परराज्य आणि परदेशातून पर्यटकांचा ओढा नाशिकच्या समृद्धीत अधिकच भर टाकणार आहे.