निर्नयक्षमता

decision-1कामाचा झपाटा वाढवतानाच विविध निर्णय वेळच्या वेळी घेतले जाणेही गरजेचे आहे. परंतु वेगाने निर्णय घेणे वेगळे आणि घाईगडबडीने निर्णय घेणे वेगळे. वेगाने निर्णय घेतले पाहिजेत, पण ते विचारपूर्वक घेतले पाहिजेत. घाईगडबडीने घेतलेले निर्णय वेगवान असतात. परंतु ते विचाराने घेतलेले नसतात. हा या दोन्हीतील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. वेगाने निर्णय घेण्याच्या भरात घाईगडबडीने घेतल्या जाणार्‍या निर्णयामध्ये आपण एखाद्या गोष्टीची नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून निर्णय घेत आहोत का? याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. म्हणूनच निर्णय घेताना कसे वागावे याबाबत काही परवलीचे शब्द सांगितले जातात. वेट अँण्ड वॉच हा असाच एक शब्द आहे. त्यामध्ये कोणतीही कृती करताना किंवा निर्णय घेताना थोडी वाट पाहा आणि निरीक्षण करून नंतरच निर्णय घ्या असे सुचवले आहे.
आणखी एका शब्दात पॉज अँण्ड डिसाईड असे म्हटले आहे. पॉज म्हणजे नेमके काय याचा मराठी प्रतिशब्द अद्याप तयार झालेला नाही. पण एखादा वक्ता भाषण करताना दोन वाक्यांच्यामध्ये काही क्षण थांबतो किंवा एखादे महत्त्वपूर्ण वाक्य उच्चारण्याच्या आधी क्षणभर शांत उभा राहतो आणि नंतर वाक्य उच्चारतो. त्या थांबण्याला, शांत बसण्याला पॉज असे म्हटले जाते. मनात कोणताही निर्णय घेण्याचा विचार आल्यानंतर एक पॉज घ्यावा आणि नंतरच निर्णय घ्यावा. पॉज घेण्याच्या वेळामध्ये आपण नकारात्मक भावनेतून निर्णय घेत आहोत का याचा क्षणभर विचार करावा आणि नंतरच निर्णय घ्यावा. अशा पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेणे हितावह ठरेल. घाईने निर्णय घेण्याचे घातक परिणाम भोगावे लागतात. काही वेळा यामुळे बरेच आर्थिक नुकसानही संभवते. हे टाळण्यासाठी सबुरी बरी.