पाऊस अखेर बरसला …..

paus
पाणीटंचाईने होरपळलेल्या राज्याला दोन दिवसांपासून हजेरी लावलेल्या मोसमी पावसाने दिलासा दिला आहे. अरबी समुद्रात गुजरात ते केरळच्या किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात शनिवारी कोकण-गोव्यात मुसळधार; तर मध्य महाराष्ट्रातही संततधार पाऊस झाला. पुण्यात 4.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्‍वरमध्ये शनिवारी रात्रीपर्यंत 43 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यासह येणारे पावसाचे ढग न आल्यामुळे बळिराजासह नागरिक चिंताग्रस्त झाले होते. मात्र समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचप्रमाणे नैर्ऋत्य मोसमी वारे गुजरातच्या आणखी काही भागांत पुढील 48 तासांत दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्येकडे पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा किनाऱ्याकडे सरकले आहे. समुद्रसपाटीवर गुजरात ते केरळच्या किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, 48 तासांत कोकण-गोव्यात 75-80 टक्के भागात मुसळधार; तर मध्य महाराष्ट्रात 50-75 टक्के भागात हलकासा पाऊस, मराठवाड्यात 25-50 टक्के भागात पाऊस पडेल. दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस होईल.