पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर

ahilyadeviअठराव्या शतकातील अस्थिर, अशांत, अधर्म व अनितींच्या साम्राज्यात आपल्या सार्वजनिक कल्याणकारी कार्याने तसेच भावनात्मकतेने, संपूर्ण भारताला एकसुत्राने अहिल्याबाईनी बांधले होते. म्हणून त्यांना लोकमाता या शब्दाने संबोधिले जाते. लोकमाताच नव्हे तर प्रात:स्मरणीय, पुण्यश्लोक अशाही शब्दातून त्यांना आदराने आजही ओळखतात. भविष्यातही त्या सदैव ओळखल्या जातील.भारताच्या कोणत्याही तीर्थक्षेत्री जावे, तेथे अहिल्याबाईनी केलेली सार्वजनिक कामे आजही जिवंत आढळतील.
संत तुकारामाच्या शब्दात सांगायचे म्हणजे  जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति, देह कष्टविती उपकारे !!
त्यांची सार्वजनिक कामे म्हणजे जुन्या मंदिरांचा तीर्णोद्वार, गरिबांच्या निवासस्थानाकरिता धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खणणे, अन्नछत्रे, तीर्थक्षेत्री सुगमतेने जाण्यायेण्याकरिता रस्ते बांधणे, वगैरे. धर्म आणि संस्कृतीच्या संरक्षणाकरिता आणखी कितीतरी कामे त्यांनी आपल्या हयातीत केली.

केवळ मानवजातीसाठीच त्यांनी ही सार्वजनिक लोककल्याणकारी कामे केली नाहीत, तर पशुपक्ष्यांच्या चराईसाठी सुद्धा शेकडो रस्ते त्यांनी विकत घेऊन मुक्त ठेवले होते.
त्यांनी त्यांच्या काळात प्रत्येक प्राणीमात्रावर पुत्रवत प्रेम केले. वास्तूशिल्पाच्या निमित्ताने संपूर्ण भारताचा समन्वय साधला. माणुसकिशी माणूस जोडून, माणसांना राष्ट्राशी जोडून, इंदू  आणि महेश्वर या दोन्ही पावन भूमीच्या गौरवात वृद्धी केली. म्हणूनच इंदूरला अहिल्यादेवीची पावन नगरी म्हणतात.