पोळा…… कृतज्ञेचा सोहळा.

pola
पोळा हा शेतकऱ्यांचा आवडता सण आहे,आपल्या कष्टात नेहमी साथ देणाऱ्या बैलाला मायेने गोंजारण्याचा त्याची पूजा करण्याचा आणि त्याने केलेल्या श्रमाला मोल देणारा सण म्हणजे बैल पोळा. बैलाचे शेतकऱ्यावरती अनंत उपकार असतात व हे तो आयुष्यभर फेडू शकत नाही म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अत्यंत आत्मियतेने साजरा केला जातो.
महाराष्ट्रात ह्या सणाला विशेष महत्व आहे.बळीराजा आपल्या शेताला हिरवेपण देतो त्याच्या घामाच्या प्रत्येक धारेत त्याचा साथीदार म्हणून बैल उभा असतो.
आपल्या कृषीप्रधान भारत देशात बैलांना फार महत्व आहे. पोळा हा बैलांचा सण आहे. श्रावण अमावास्येला पोळा साजरा केला जातो. बैल म्हणजे श्रम
म्हणजेच कष्ट. अशा कष्ट करणाऱ्याची पूजा म्हणजेच जो दुसऱ्यासाठी श्रम घेतो अशा श्रमदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस होय. या दिवशी फक्त बैलांचीच नव्हे तर शेतीसाठी लागणाऱ्या नांगर, विळी, कोयता, खोर इत्यादी साधनांचीदेखील पूजा केली जाते. सजीवाबरोबर निर्जीवामध्येदेखील ईश्वर बघण्याची, त्याची पूजा करण्याची आपल्या संस्कृतीची परंपरा आगळीच म्हणावी लागेल.

पोळ्याच्या दिवशी बैलांना न्हाऊ घालतात. पंचारती ओवाळतात. पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवितात. शिंगाना हिंगूळ वं बेगड लावतात. गळ्यात सुंदर माळा वं पायात घुंगरूदेखील बांधतात. संपूर्ण शरीरावर सुंदर नक्षीकाम करतात. पाठीवर रंगीबेरंगी झुल टाकतात. एखाद्या नव्या नवरीच्यावर त्याचा शृंगार करतात. आपले हे अनोखे रूप बघून बैलदेखील उत्साहाने खुलतात. एवढे सगळे करून झाल्यावर त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढतात. आपला बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा अभिमान असतो.