फटाके टाळा , आयुष्य सांभाळा .
|श्रीकृष्णाने आसुरीवृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला अनाचार, दुष्टप्रवृत्ती, लालसा व भोगवृत्तीपासून मुक्त केले व दैवी विचार देऊन सुखी केले. आपण या कार्याची आठवण ठेवण्यासाठी दीपोत्सव साजरा करून आनंद व्यक्त करतो आणि फटाके फोडून ध्वनिप्रदूषण वाढवतो. त्याचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून आता ध्वनिप्रदूषणाचा नरकासूर गाडण्याची वेळ आली आहे.दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिवाळीतील अमावास्येचा अंधार कानठळ्य़ा बसवणार्या फटाक्यांनी दूर होत नाही, तर डोळ्य़ासमोर काजवे मात्र चमकून सर्वत्र आणखी अंधार झाल्याचा भास होतो. दिवाळीत विविध प्रकारचे फटाके येतात, तेव्हा बालझुंबड उडते. यात आकर्षक, डोळे दिपवणारे फटाके असतात. त्याचबरोबर कानाला इजा होईल इतपत मोठय़ा आवाजाचेही फटाके असतात. मुलींना भुईचक्र, अनार, फुलबाजा, वायर, हातचक्र, सापगोळी व लवंगी फटाके आवडतात. हे विनाआवाजाचे फटाके वायुप्रदूषणाचा उच्चांक गाठतात. मुलांना मोठय़ा आवाजाचे व आकाशात विविध रंग उधळणारे रोषणाई फटाके आवडतात.
व्होल्कॅनो अँटमबॉम्बचा आवाज इतर फटाक्यांपेक्षा जास्त असतो. म्हणून अशा अँटमबॉम्बची मागणी जास्त असते. अशा फटाक्यांनी हवेत विषारी वायूचे प्रमाण वाढते. त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, चिडचिडेपणा व रक्तदाब वाढतो. अशा आवाजाने सामान्य माणसाचासुद्धा रक्तदाब वाढू शकतो. हृदयाचे ठोके वाढतात. घाम येतो. पटकन थकवा जाणवतो आणि त्यामुळे कामातील उत्साह कमी होतो. रंग ओळखण्यास कठीण जाते आणि दृष्टीवर परिणाम होतो. या आतषबाजीमुळे सुमारे पाच हजार नागरिकांना वर्षाकाठी अंधत्व येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. लहान मुलांना येणार्या एकूण अंधत्वापैकी अनेक मुले फटाक्यांमुळे होणार्या जखमांनी अंध होत असतात. फटाक्यातील दारूमध्ये प्रामुख्याने गंधक, नायट्रेट, परफ्लोरेट, नायट्रेट हे घटक असतात. हे घटक फटाका फुटल्यावर डोळ्य़ात गेल्यास त्या व्यक्तीला अंधत्व येऊ शकते. रुग्णालयातील नवजात बालके, तसेच रुग्ण यांना फटाक्यांच्या आवाजाचा विलक्षण उपसर्ग होतो. कानठळ्य़ा बसवणार्या फटाक्यांमुळे सदाचा बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते. फटाक्यांमुळे कान बधिर होतात. श्रवण यंत्रणातील पेशी एकदा मृत झाल्या की पुन्हा निर्माण होत नाहीत. फटाक्यामुळे श्वसनाचे आणि फुप्फुसाचे विकार वाढतात. गर्भवती महिलांना फटाक्यांच्या ध्वनिप्रदूषणाचा अपाय होतो. दम्याच्या रुग्णांत वाढ होते. पूर्वी फटाक्यांची विक्री फक्त दिवाळीपुरती र्मयादित होती. आता बाराही महिने फटाके बाजारात मिळतात. रॉकेट, बाणासारख्या फटाक्यांमुळे आगी लागण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात होतात. फटाक्यांमुळे आगी लागून अपघात तर होतातच शिवाय कानठळ्य़ा बसवणार्या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. घराचे प्लास्टरिंग सैल होते. फटाक्यांच्या आवाजाने मोठय़ा प्रमाणावर बेवारशी कुत्रे जास्त पिसाळून सर्वसामान्य नागरिकांना चावण्याची शक्यता असते. फटाक्यांच्या निर्मितीसाठी बालकामगार वापरले जातात.
दिवाळी हा मौजमजेचा सण नसून धार्मिकता व संस्कृती जपण्याचा सण आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दिवाळी सण साजरा करूया.